Breaking News

राणी पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करा!

बुलडाणा, दि. 07, नोव्हेंबर - राणी पद्मावती चित्रपटाच्या माध्यमातून संजय लिला भंसाली यांनी राजपूत समाजाचा इतिहास चुकीच्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे  हा चित्रपट प्रदर्शित न करता त्याच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली आहे.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, संजय लिला भंसाली निर्मित महाराणी पद्मावती चित्रपटामध्ये महाराणी पद्मावती यांचा अपमान केला  आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या तसेच राजपूत समाजाच्या भावना दुखावणारा हा चित्रपट आहे. आपल्या शिलत्वाच्या रक्षणासाठी सोळा हजार स्त्रीयांना घेऊन जोहर करणार्‍या महाराणी  पद्मावती यांचा तेजस्वी इतिहास जाणीवपुर्वक कलंकीत करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. हा चित्रपट समाजाच्या तज्ज्ञ इतिहासकारांना दाखविण्यात यावा व  त्यामध्ये महाराणी पद्मावती संदर्भात आक्षेपार्ह चित्रिकरण नसेल, याची खात्री झाल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित करावा. मातृभुमी आणि हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी राजपूतांनी हजारो  वर्षे संघर्ष करुन त्याग आणि बलिदान दिले आहे.
म्हणून पद्मावती चित्रपट प्रदर्शित  करू नये आणि निर्मात्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील या निवेदनातून करण्यात आली असून प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने न  घेतल्यास होणार्‍या  परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महासचिव ईश्‍वरसिंग चंदेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक राजपूत, जिल्हा संघटक  सतिश राजपूत, बुलडाणा तालुका अध्यक्ष विनोद राजपूत, तालुका उपाध्यक्ष गजानन जगताप, पवन राजपूत, संतोष राजपूत, गणेश राजपूत, संजय चव्हाण, योगेश बैस, स्वप्नील  वाघ, करण राजपूत यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.