अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी कुटुंबियाची उच्च न्यायालयात धाव
सांगली, दि. 25, नोव्हेंबर - अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी व या खून खटल्यात तत्कालीन सांगली शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. श्रीमती दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती कोथळे कुटुंबियांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. या याचिकेवर दि. 4 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून सुरू असलेल्या तपासाबाबत असमाधानी असल्याचे सांगून अनिकेत कोथळे याचा भाऊ आशिष कोथळे म्हणाला, की किरकोळ कारणावरून अटक केलेल्या अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत अमानुष छळ का केला गेला व त्याचा जीव घेण्यापर्यंत त्याला पोलिसांनी का मारले, याबाबत कोणाकडूनही समाधानकारक माहिती दिली जात नाही. त्यामुळेच कोथळे कुटुंबियांना नाईलाजास्तव उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे.
या घटनेनंतर अनिकेत कोथळे हा पळूनच गेला आहे, असा दावा तब्बल 15 तास छातीठोकपणे करणार्या श्रीमती दीपाली काळे यांनाही या प्रकरणातून वाचविण्याचा प्रयत्न संबंधित तपास अधिकार्यांकडून सुरू असल्याचा संशय व्यक्त करून ते म्हणाले, की राज्य गुन्हा अन्वेषण विभागाला गत 15 दिवसात केलेल्या तपासात कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत.
संबंधित आरोपींचे भ्रमणध्वनी, सांगली शहर पोलिस ठाणे व लकी बॅग्ज हाऊसमधील सीसी टिव्ही फुटेजही ताब्यात घेता आलेले नाही. याउलट राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडील वरिष्ठ अधिकारी संबंधित आरोपींकडून तपासात असहकार्य केले जात असल्याची कबुली दिली जात आहे. त्यामुळे एकूणच राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या या तपासाबाबत कोथळे कुटुंबिय असमाधानी आहे.
अनिकेत कोथळे हत्याप्रकरणाचा संपूर्ण तपास त्रिसदस्यीय विशेष तपास पथकामार्फत करावा, श्रीमती दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, या विशेष तपास पथकात पोलिस महासंचालक, राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व जिल्हाधिकारी अशा दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश असावा, ही संपूर्ण तपास प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पूर्ण केली जावी व संबंधित तपास यंत्रणेने दर आठवड्याला आपला अहवाल सादर करावा, अशा मागणीची याचिका कोथळे कुटुंबियाच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आता या याचिकेवर दि. 4 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.