Breaking News

कर्जमाफीच्या दिरंगाईमुळे झालेल्या आत्महत्यांसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करा - मोहन प्रकाश

चंद्रपूर, दि. 07, नोव्हेंबर - कर्जमाफीच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात झालेल्या शेतकरी आत्महत्यांना सरकार जबाबदार असून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त के ल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे. ते चंद्रपूर येथे जनआक्रोश मेळाव्यात बोलत होते.
भाजप सरकारच्या तीन वर्षाच्या अपयशी कारभाराविरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यव्यापी जनआक्रोश सप्ताहाचे आयोजन केले आहे. आज चंद्रपूर येथे चौथा जनआक्रोश मेळावा  आयोजीत करण्यात आला होता.
सरकारने गेल्या तीन वर्षात एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली. काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढाई सुरु केली आहे. लाठ्या काठ्या खाऊ. जीव गेला तरी बेहत्तर पण जनतेला  न्याय देण्यासाठी संघर्ष करू. भाजप सरकारची कर्जमाफी म्हणजे तारीख पे तारीख. घोषणा करून चार महिने झाले कर्जमाफीचे पैसे दिले नाहीत आणि ऊर्जामंत्री म्हणतात सात  दिवसांत वीज बिल भरा अन्यथा कनेक्शन तोडू. अगोदर कर्जमाफीचे पैसे द्या. 25 वेळा शासन निर्णय बदलले. लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून जाचक अटी व शर्ती  घातल्या. कर्जमाफीच्या फॉर्ममध्ये शेतक-यांची जात विचारता. जात पाहून कर्जमाफी देणार का ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.
आघाडी सरकारच्या काळात शेतक-याची आत्महत्या झाली तर सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस करायचे. भाजप सरकारच्या काळात 12  हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारने आता स्वतःवर 302 चा गुन्हा दाखल करावा. जनतेचा अंत पाहू नका. जनता पेटून उठली आहे. आता तुमचे  सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. राज्यात आणि केंद्रात परिवर्तन निश्‍चित आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.