Breaking News

अपूर्ण घरकुले कालमर्यादेत पूर्ण करणार्‍या अधिकार्‍यांना देणार पुरस्कार - पंकजा मुंडे

मुंबई, दि. 07, नोव्हेंबर - राज्यातील ग्रामीण गृहनिर्माणमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांमधील अपुर्ण घरकुले कालमर्यादेत पूर्ण करणार्‍या अधिकार्‍यांना प्रोत्साहनपर पुरस्क ार देणार असल्याचे सांगून प्रत्येक तीन महिन्यात आढावा घेणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे कामकाज विषयी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
मुंडे म्हणाल्या, राज्यात ग्रामविकास विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजना तर आदिवासी विकास  विभागामार्फत शबरी,आदिम व पारधी आवास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या अंतर्गत सन 2015-16 व 2016-17 या आर्थिक वर्षातील कामांचा भौतिक आढावा  त्यांनी घेतला, यामध्ये एकूण 95 हजार 484 घरकुले पूर्ण झाली आहेत. सन 2016-17 या कालावधीत 48 हजार 649 घरकुले पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सन  2017-18 या वर्षासाठी नुकतेच उद्दिष्ट प्राप्त झाले असल्याचे सांगून प्रधानमंत्री आवास योजनेची कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राप्त उद्दिष्टांना तात्काळ मंजुरी देवून सर्व विभागांनी समन्वयाने घरकुलाची कामे दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करावेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य  योजनेचा आढावा घेताना त्या म्हणाल्या, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. या योजनेंतर्गत ऑक्टोबर 2017 अखेर 573  लाभार्थीना जागा खरेदीसाठी 1 कोटी 57 लाख 98 हजार 158 रुपये उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.