Breaking News

विनापरवाना विदेशी मद्यविक्री प्रकरणी सात जणांविरुद्ध कारवाई

रत्नागिरी, दि. 10, नोव्हेबर - राजापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाचल बाजारपेठेतील चार हॉटेलमधून विदेशी विनापरवाना मद्य व रोख रकमेसह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त के ला. या प्रकरणात सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
राजापूरच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार पाचलमध्ये चार हॉटेलमध्ये विदेशी दारू विनापरवाना विकली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे  आल्या होत्या. त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी या चारही ठिकाणी हॉटेल व बिअरबार सुरू होते. तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या  निर्देशानुसार ते ग्रामपंचायत हद्दीतील 220 मीटरच्या आत असल्याने ते बार नियमानुसार सील करण्यात आले होते. तेथील चारही हॉटेलांमध्ये मात्र विनापरवाना विदेशी मद्याची विक्री  सुरूच होती. राजापूर पोलिसांकडे तक्रारी येताच काल आठवडा बाजारच्या दिवशी पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी आपला मोर्चा पाचलकडे वळविला. आपल्या सहकार्‍यांसह त्या  पाचलमध्ये दाखल झाल्या व तत्काळ कारवाई सुरू केली. साध्या वेशातील पोलिसांनी चारही ठिकाणी विदेशी मद्य व रोकड असा सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  या कारवाईत अशोक रघुनाथ सक्रे, संतोष मोतिराम हडसे, संदीप महादेव आयरे, अभिषेक वसंत कानडे, शांताराम नारायण सुतार, प्रशांत हरिश्‍चंद्र तावडे, सुरेश जोशी यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित हॉटेलच्या मालकांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.