Breaking News

राजापूरच्या ब्रिटिश वखारींच्या जागेवर साकारणार शिवसृष्टी

रत्नागिरी, दि. 19, नोव्हेंबर - स्वराज्याची स्थापना करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांसह ब्रिटिशांच्या राजापूरमधील अस्तित्वाच्या खुणा जोपासणा-या शहरातील ब्रिटिशांच्या वखारीच्या जागेचा पर्यटनदृष्ट्या विकास करीत त्या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा मानस रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात वखारीच्या जागेच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्याचेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे परकीय राजवटींच्या खुणा जोपासणारी वखारीची जागा शिवसृष्टी घेणार आहे.


राजापूरमधील खडपेवाडीत इंग्रजांची वखार होती. या इमारतीतून ब्रिटीश राजापुरातील आपल्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवून होते. या वखारीत दारूगोळा साठविला जात असे. त्यामुळे ब्रिटिशांच्या वास्तव्याच्या काळात वखारीला विशेष महत्त्व होते. ब्रिटिश साम्राज्याचे मूक साक्षीदार असलेली ही इमारत डागडुजीअभावी जीर्ण होऊन ठिकठिकाणी ढासळली होती.

 त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती वा सुशोभीकरण होण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने ती काही वर्षांपूर्वी जमीनदोस्त केली. ब्रिटिशांच्या वास्तव्याच्या विविध खाणाखुणा आजही राजापूर परिसरात आढळतात. त्या ठिकाणांची डागडुजी आणि सुशोभीकरण केल्यास त्याचा पर्यटनस्थळ म्हणून ही जागा नावारूपास येऊ शकते. त्याबाबत राजापूरवासीयांनी सातत्याने मागणी केली आहे. त्याची दखल घेऊन पालकमंत्री श्री. वायकर यांनी वखारीच्या जागेचे संवर्धन आणि जतन करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
राजापूरच्या जवाहर चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण झाले. त्यावेळी बोलताना श्री. वायकर यांनी वखारीच्या जागेच्या ठिकाणी शिवसृष्टी उभारणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे जमीनदोस्त झालेल्या वखारीच्या जागेच्या ठिकाणाला लवकरच पर्यटनदृष्ट्या नवा साज मिळण्याचे राजापूरवासीयांचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.