मुख्य ऐवजी सहआरोपीच हाती, पोलिसांची राजस्थान वारी वाया
सोलापूर, दि. 19, नोव्हेंबर - जीवनसाथी डॉट कॉमवरून सोलापुरातील एका तरुणीची सुमारे 24 लाखांना फसवणूक झाली. यातील राजस्थानच्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांना सोलापुरात आणण्यासाठी येथील पोलिसांनी तब्बल 165 दिवस लावले.
तोपर्यंत राजस्थानमध्ये संशयित आरोपी जामिनावर सुटले. नायझेरीयाचे दोन संश यित सोलापूर पोलिसांच्या हाताला लागले. इझीग्बो नॉनसो चुकवूनवाईक ऊर्फ जेम्स डेव्हिड आणि चिके पोल ऊर्फ चिकबाटा चिके सॅम्युअल अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सखराम यलप्पा केसकर (वय 62, रा. सुरवसेनगर, कुमठा नाका) यांनी 26 एप्रिल रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
अशा फसवणुकीचे देशभर जाळे असून, बिकानेर शहर पोलिसांनी चौघा संशयितांना एप्रिल रोजी दिल्लीत अटक केली होती. एकूण 20 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये झारखंडचा अजीतकुमार यादव, बाडमेरचा श्रवणसिंह सोढा, जोधपूरचा वीरेन नाथ ऊर्फ महाराज गोस्वामी, गुडगावची अनिता कुमार यांचा समावेश होता.
न्यायालयाने त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयाची मंजुरी घेऊन या आरोपींना पुन्हा राजस्थान पोलिसांच्या हवाली केले जाणार आहेत. यापूर्वी त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती.
