Breaking News

लोकशाही शाप की वरदान?

दि. 11, नोव्हेंबर - लोकशाही शाप की वरदान असा प्रश्‍न कुणी विचारण्याचे धाडस केले तर त्याला वेड्याच्या इस्पीतळात नेण्यासाठी देशातील सारे  विद्वान मतभेद विसरून एकञ  येतील.आज आम्ही माञ हे धाडस करण्याच्या मनस्थितीला पोहचलो आहोत. देशाला स्वातंञ्य मिळून आपण लोकशाही स्वीकारली पण लोकशाहीत लोकशाहीचा अमंल आहे का?  असा प्रश्‍न सामान्य माणूस विचारीत आहे.लोकशाहीने भले सारे अधिकार बहाल केलेले असोत, पण ते कुणासाठी सामान्य माणसासाठी हे अधिकार वापरण्याचे स्वातंञ्य आहे का?  या प्रश्‍नाचे उत्तर प्रश्‍न कर्त्याला वेडा ठरविणारे विद्वान देणार नाहीत.
स्वातंञ्य किंवा लोकशाहीचा नक्की अर्थ काय? हे समजून सांगण्याची,समजून घेण्याची आणि त्याहीपेक्षा त्या अर्थाचा अंमल करण्याची निकड तिव्रतेने भेडसावू लागली यातच  आमच्या म्हणण्याचा मतितार्थ सामावलेला आहे.
मतदानाचा आधिकार मिळाला म्हणून आम्ही स्वतंञ आहोत! म्हणून आम्ही लोकशाहीचे पाईक आहोत! आम्ही मुक्त संचार करू शकतो,आमचा निर्णय आम्ही घेऊ शकतो, राबवू  शकतो म्हणून आम्ही स्वतंञ आहोत! लोकशाहीचे पाईक आहोत! या पलिकडे जाऊन सामान्य माणसाला स्वातंञ्याने किंवा लोकशाहीने कुठला लाभ दिला? लोकशाही राष्ट्राच्या  स्वतंञ राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार तरी प्रदान केले जातात का?
या देशाला स्वातंञ मिळाल्यानंतर लोकशाहीचा गाजावाजा झाला.तरीही कुठले ना कुठले अधिकार हक्क मिळवण्यासाठी ज्याच्यासाठी लोकशाही अस्तित्वात आली त्या सामान्य  माणसाला संघर्ष करावा लागत आहे. अन्न वस्र निवारा, शिक्षण, आरोग्य या सारख्या मुलभूत आधिकारांचा संघर्ष सत्तर वर्षांनंतरही सुरू आहे.
लोकशाहीला विळखा घातलेल्या शासित व्यवस्थेने सामान्य माणसाच्या हक्कांना ओलीस ठेवल्याने स्वातंञ्याची हेळसांड होत असल्याचे निरिक्षण नोंदविण्यास बराच वाव आहे.या  देशाच्या लोकशाहीत अंमल होत असलेले स्वातंञ्य एक तर्फी आहे. हा मुद्दा एव्हढा गंभीर बनला असतांना त्यावर चर्चा होत नाही किंबहूना दाबली जाते. एक तर्फी प्रेमाची चर्चा  जेव्हढ्या तिव्रतेने केली जाते तेव्हढे भाग्य या मुद्याला लाभले तरी लोकशाहीची मुल्य संवर्धनासाठी हातभार लागू शकतो.
विपर्यास किंवा विनोदाचा भाग सोडा पण सहज पणे दुर्लक्षित करण्याइतका हा मुद्दा साधा नाही. त्यामागचे गांभिर्य वेळीच लक्षात घ्यायला हवे.शासकीय कार्यालयात सामान्य  माणसाला मिळत असलेली वागणूक,यातील छोटे छोटे क्षण लक्षात घेतले तरी आपल्याला असलेले स्वातंञ्य कसे तोडले मोडले जाते याची कल्पना यायला हरकत नाही.लोक शाहीत या देशाचा, संपत्तीचा, आणि म्हणूनच व्यवस्थेचा मालक असलेला सामान्य माणूस त्याची नोकर असलेल्या व्यवस्थेकडून नागविला जातो. तरीही लोकशाही स्वातञ्यांच्या  गप्पा मारल्या जातात.
सामान्य माणूस नागविला जातो, व्यवस्थेच्या भ्रष्टतेचा बळी ठरतो म्हणून समाज सेवक आण्णा हजारे यांनी सामान्य माणसाच्या हाती माहितीच्या अधिकाराचे हत्यार दिले, हे हत्यार  सामान्य माणसाच्या हातात दिसत असले तरी त्याचा खटका (स्ट्रीगर) माञ व्यवस्थेच्याच नियंञणात आहे.परिणामी हे हत्यार कुठल्याही क्षणी न्याय मागणार्याचा बळी घेण्यास  तत्पर ठरत आहे. शेवटी माहिती अधिकाराचा अंमल करणारे या यवस्थेचाच एक अविभाज्य भाग आहेत. राज्य माहीती आयोगापासून जनमाहीती कक्षापर्यंत याच बरबटलेल्या  व्यवस्थेतील गोचड्या सामान्य माणसाच्या अधिकाराचे रक्त पित आहेत.