Breaking News

गुजरात निवडणुकीपुर्वीच राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी?

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची अध्यक्षपदी वर्णी लावण्याच्या घडामोडीत वाढ झाली असून, गुजरात निवडणुकांपूर्वीच त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवले जाऊ शकते अशी चर्चा आहे. राहुल गांधींना कांग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. त्यासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणी समितीची सोमवारी बैठकही बोलवली आहे. 


सकाळी 10.30वा सोनिया गांधींच्या घरी म्हणजे 10 जनपथवर ही बैठक बोलवली आहे. याच बैठकीत काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीद्वारे अध्यक्षपदाच्या निवडीच्या तारखांवर निश्‍चिती होऊ शकते. काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने होत असते. पण राहुल गांधी शिवाय कोणीच अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला नसल्यामुळे आता राहुल गांधीची बिनविरोध अध्यक्षपदी निवड होऊ शकते. 

सोनिया गांधी सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 9 डिसेंबरच्या आधीच राहुल गांधीची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक होऊ शकते. सध्या गुजरातमध्ये राहुल गांधी जोरदार प्रचार करत आहे. त्यांची प्रतिमाही दिवसेंदिवस सुधरते आहे. त्यामुळे काँग्रेसच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तरी या सगळ्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर आता यापुढे काय घडामोडी घडतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले आहे.