वृध्दांना स्वेटर व चादर वाटून माजी सैनिकांनी केला संविधान दिन साजरा
प्रास्ताविकात शिवाजी पालवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित व दुर्लक्षितांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देशासाठी तयार केलेल्या संविधानामुळे सर्व भारतीयांना समान दर्जा मिळून, समता, बंधुता व स्वातंत्र्यता प्रस्थापित झाली आहे. मात्र आर्थिक विषमतेची दरी दूर करण्यासाठी प्रत्येकाने वंचित घटकाला मदतीचा हात देण्याचे आवाहन करुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. प्रारंभी 26-11 च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
रघुनाथ औटी म्हणाले की, माजी सैनिकांनी देशाच्या रक्षणाचे कर्तव्य बजावून, वंचित घटकांना मायेची उब दिली आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून माजी सैनिकांनी चालू केलेले सामाजिक काम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. दिगंबर शेळके यांनी थंडी मुळे गरीब वंचित घटकातील वृध्दांना यातना सहन कराव्या लागतात. त्यांना मायेचा आधार देणे ही आपल्या संस्कृतीची शिकवण असल्याची भावना व्यक्त केली.
जिल्ह्यातील माजी सैनिकांनी एकत्र येवून जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनची स्थापना केली आहे. यामधील माजी सैनिक सदस्य पेन्शनमधील काही रक्कम जमा करुन दर महिन्याला विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण, गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्वच्छता अभियान, स्त्री जन्माचे स्वागत, जलसंवर्धन जागृती, वृध्दांना काठी वाटप आदि विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.