मडगाव-कोल्हापूर मार्गावर कोकण रेल्वेची खास गाडी
रत्नागिरी, दि. 18, नोव्हेंबर - कोकण रेल्वेमार्गावरून मडगाव ते कोल्हापूर या मार्गावर प्रथमच विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. 00128 क्रमांकाची ही गाडी मडगावहून येत्या मंगळवारी (दि. 21 नोव्हेंबर) सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी सुटेल.
करमळी, थिवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज या स्थानकांवर गाडी थांबणार आहे. ही गाडी अकरा तासांचा प्रवास करून बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) पहाटे पावणेसहा वाजता छत्रपती शाहू महाराज स्थानकावर पोहोचेल. पंधरा डब्यांच्या या गाडीला 12 शयनयान, आणि दोन सर्वसाधारण डबे असतील.
प्रायोगिक तत्त्वावर कोकण रेल्वे मार्गावरून प्रथमच अशी गाडी सोडण्यात येत असून या गाडीमुळे गोवा आणि कोकणातील प्रवाशांना प्रथमच सातारा आणि कोल्हापूरपर्यंतच्या स्थानकांवर प्रथमच रेल्वेने प्रवास करता येणार आहे.
