सहकारी सोसायट्या आर्थिक सक्षम करा - सुभाष देशमुख
सांगली, दि. 18, नोव्हेंबर - ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी या या संबंधित गावातील विकासाचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे गावातील प्रत्येक घटकाला या सहकारी सोसायट्यांशी जोडून घ्या, सभासद वाढवा, ठेवी संकलन वाढवा व सेवक म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत या सहकारी सोसायट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी केले.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या सक्षमीकरण कार्यशाळा 2017 या कार्यक्रमात सुभाष देशमुख बोलत होते.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या सक्षमीकरण कार्यशाळा 2017 या कार्यक्रमात सुभाष देशमुख बोलत होते.
राज्य शासनाने अटल महापणन अभियान व पीक कर्जमाफी या माध्यमातून शेतकर्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पीक कर्जमाफीपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देऊन सुभाष देशमुख म्हणाले, की शेतक-याला मुलभूत सुविधा देण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य आहे. मुबलक पाणी, वीज, शुध्द बियाणे, रास्त भावात खते, कमी दराने पतपुरवठा, उत्पादनाला चांगला भाव, नाशवंत मालासाठी तारण कर्ज, सौर उर्जेवर वीजपंप व उपसा योजनेचे पंप अशा सहकार्यातून शेतकरी स्वयंपूर्ण होईल व त्याला कर्जमाफी मागावीच लागणार नाही.
सहकार क्षेत्र समृध्द झाले तरच महाराष्ट्र समृध्द होणार आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. अशा सक्षमीकरण कार्यशाळांतून ते शक्य होईल. सांगली जिल्हा हा सहकार पंढरी म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात सांगली जिल्हा सहकार क्षेत्रात राज्यातच नव्हे, तर देशात अग्रेसर करण्याचा संकल्प करा.
सांगली जिल्ह्यातील एकही खातेदार विविध कार्यकारी सोसायटीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत. गावातील प्रत्येक खातेदाराला सहकारी सोसायटीचा सभासद करून घ्यावे. सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी ही नैतिक जबाबदारी म्हणून सहकारी सोसायट्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. सहकारी सोसायट्यांबाबत प्रत्येक घटकाच्या मनात विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे.
त्यासाठी सहकारी सोसायट्यांनी व्यवसाय उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. या कार्यशाळेस सांगली जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
