Breaking News

दखल - मोदींपेक्षा हार्दिकच जास्त लोकप्रिय.

खरं तर असा मथळा वाचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांच्या डोक्यांतील आग आणखी भडकण्याची शक्या आहे. कुठं मोदी व कुठं हार्दिक, असा सवाल भक्त मंडळी करण्याचीही शक्यता आहे. मोदी यांची लोकप्रियता जगात आहे. फोर्ब्ज, टाईमसारख्या जगातील अव्वल दर्जाच्या मासिकांनी मोदी यांचं छायाचित्र पहिल्या पानावर प्रसिद्ध करून जगातील लोकप्रिय व्यक्तीतील त्यांचं स्थान अधोरेखित केलं होतं. असं असताना नेमकं गुजरातची निवडणूक चालू असताना मोदी यांची लोकप्रियता कमी कशी होईल, असा प्रश्‍नही भक्तांना पडण्याची शक्यता आहे; परंतु ज्या राहुल गांधी यांची भाजप गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं टिंगल टवाळी करीत होता, खिल्ली उडवीत होता, त्याच राहुल गांधी यांची समाजमाध्यमातील टिप्पणी भाजपला आता गांभीर्यानं घ्यावी लागत आहे. 


काँग्रेसनं गुजरातच्या दंगलीत मोदी यांची संभावनी जशी मौत का सौदागर अशी केली, त्यानंतर त्यांची चायवाला अशी खिल्ली उडवविली; परंतु त्यात मोदी यांचं काहीच नुकसान झालं नाही. नकारात्मक प्रचारातूनही पक्षाची, व्यक्तींचा प्रचार आपोआप होऊ लागतो. त्याचा फायदा मिळतो. भाजपला तसा फायदा मिळाला. पप्पू म्हणून ज्याची संभावना केली, त्याच्या प्रत्युत्तरासाठी भाजपला अख्खी फौज मैदानात उतरवावी लागली आहे. आता तर राहुल गांधी यांचा धर्म कोणता याचं भांडवल करण्याची वेळ भाजपवर आली आहे, तर त्याला उत्तर देताना काँग्रेसही विवेक हरवून बसली आहे. 

अल्पसंख्याकांचं लांगुलचालन मागं भोवलं, त्यामुळं आता हिंदुत्त्व आपलंसं करताना राहुल जानवेधारी हिंदू असल्याचं सांगताना अप्रत्यक्षपणे उच्च वर्णीय असल्याचा संदेश तर काँग्रेसला त्यातून द्यायचा नाही ना, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. काँग्रेसनं जी चूक मोदी यांच्याबाबतीत केली, तीच चूक आता भाजप हार्दिकबाबत करीत आहे. पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीतून हार्दिकचं नेतृत्त्त्व पुढं आलं. त्याच्या सभांना लाखोंची गर्दी व्हायला लागली. मोदी यांना हार्दिक आव्हान देतो आहे, असं उगाचच भाजपच्याच नेत्यांना वाटायला लागलं. त्यामुळं हार्दिेकचं आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. त्याला देशद्रोही ठरविण्यापर्यंत मजल गेली. खरं तर त्या चुकीतून सावध होत भाजपनं हार्दिकला फार महत्त्व दिलं नसतं, तर आता जी लोकप्रियता हार्दिकच्या वाट्याला आली आहे, ती आलीच नसती. 

22 वर्षे गुजरातची सत्ता ताब्यात असताना आणि काँग्रेसची शकलं पडली असताना भाजपनं एवढ्या गांभीर्यानं घ्यायचं काहीच कारण नव्हतं; परंतु भित्यापोटी ब्रम्हराक्षस म्हणतात, तसं भाजपचं झालं आहे. अहमद पटेल यांना पराभूत करण्यात अवास्तव महत्त्व देणं, त्यानंतर काँग्रेसची फूट घडवून आणणं यामुळं भाजपला काँग्रेसची भीती वाटत असल्याचं पदोपदी जाणवत होतं. पटेल, दलित, इतर मागासवर्गीय असे वेगवेगळे समाजघटक एकत्र येत असल्यानं सत्ता जाते, की काय, अशी भीती भाजपला वाटायला लागली. गुजरातमध्ये काँग्रेसकडं संघटन नाही. नेता नाही. कार्यकर्त्यांची फळी नाही. याउलट, भाजपकडं मोदी, अमित शहा यांच्यासारखे प्रभावी वक्तृत्त्व आणि निवडणूक व्यवस्थापनात माहीर असलेले नेते असताना त्यांनी हार्दिकसारख्या अजून उमेदवारही न होऊ शकणार्‍या मुलाची भीती बाळगायचं काहीच कारण नव्हतं; परंतु तिथंही भाजपनं धास्ती खाल्ली. हार्दिकच्या एकामागून एक सेक्स सीडी बाहेर आणल्या. 

त्याची वाच्यता भाजपनं करण्याअगोदरच हार्दिकनं ते जाहीर केल्यानं भाजप उघडा पडला. या सीडी प्रसारित करण्यामागं भाजपचा काहीच हात नाही, असं भाजप सांगत राहिला; परंतु भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत सीडीचं प्रसारण झालं, याचा भाजपला विसर पडला होता. गुजरातच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मोदी व राहुल यांच्या सभांना जशी गर्दी होते, तशीच गर्दी हार्दिकच्या सभांना ही होते आहे. ज्या हार्दिकचे साथीदार भाजपनं थैल्या रिकाम्या करून फोडले, त्याच्या व्यक्तिगत चारित्र्यावर चिखलफेक केली, त्याच हार्दिकची गुजरातच्या निवडणुकीतील लोकप्रिययता आता भाजपसाठी डोकेदु:खी ठरली आहे. गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कथित सेक्स सीडीप्रकरणी आरोपांनी घेरलेला पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या लोकप्रियतेत जराही घट होताना दिसत नाही. या उलट फेसबुकवर तर सध्या हार्दिक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त लोकप्रिय असल्याचं दिसत आहे. 

याबाबत प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, फेसबुकवर 8 लाख लाइक्स घेणार्‍या हार्दिकला भाजप गुजरात फेसबुक पेजच्या तुलनेत 300 टक्के अधिक पˆतिसाद मिळत आहे. मोदी यांची फेसबुकवरील लोकप्रीयता मोठी आहे. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान लोकपिˆयतेचे आकडे बदललेले दिसत आहेत. या आकड्यांनुसार, गेल्या 7 फेसबुक लाइव्हमध्ये हार्दिकचा व्हिडिओ 33.24 लाख लोकांनी पाहिला आहे. तर, मोदी यांचा व्हिडिओ केवळ 10.09 लाख लोकांनी पाहिला आहे. इतकंच नव्हे, तर हार्दिकला या सात फेसबुक लाइव्हवर 2.39 लाख इतक्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. तर, मोदी यांच्या सभेचा व्हिडिओ केवळ एक लाख चारशे लोकांनीच पाहिला आहे. 

व्हिडिओ शेअर करण्याबाबतही हार्दिक पुढं आहे. हार्दिकच्या सभांचे व्हिडिओ 69 हजार 925 वेळा शेअर झाले आहेत, तर मोदी यांच्या सभा केवळ 12 हजार 174 वेळा शेअर केल्या गेल्या आहेत. सोशल मीडियावर भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांना जोरदार टक्कर देत आहेत. दोन्ही पक्ष व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-पˆत्यारोप करत आहेत. तर, दुसरीकडं हार्दिक पटेल यावेळी गुजरात निवडणुकीत अतिशय लोकपिˆय होत आहे. हार्दिकच्या सभा आणि रोड शोना पˆचंड गर्दी होते आहे. आपल्या सभांना लोक यावेत, यासाठी बस अथवा इतर वाहनांची व्यवस्था न करताही त्याच्या सभांना गर्दी होते आहे, हे विशेष. सध्याच्या टेक्नोसॅव्ही मतदारांची संख्या लक्षात घेतली, तर भाजपची चिंता स्वाभावीक आहे.