Breaking News

कल्याण पत्रकार हल्ला : चौघांना 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी


कल्याण, दि. 30, नोव्हेंबर - कल्याणमध्ये पत्रकार केतन बेटावदकर यांना मारहाण केल्या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी आज दिली.

कल्याणमधील होली क्रॉस हॉस्पिटलमध्ये सोमवारी रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. त्या बरोबरच पत्रकार बेटावदकर यांच्यावर अत्यंत क्रू रपणे हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. पत्रकार हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मारहाणीच्या गुन्ह्यात वाढ करत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक केली आहे. यात योगेश भोईर, महेश भोईर, अनमोल भोईर आणि हरेष पाटील अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान रुग्णालय तोडफोडीच्या पार्श्‍वभूमीवर आज कल्याणमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवाय हा सगळा प्रकार पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप करत 4 डिसेंबरपर्यंत आरोपींवर कारवाई न केल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला असल्याचे आयएमएचे राष्ट्रीय सचिव डॉ. मंगेश पाटे व महाराष्ट्र सचिव डॉ. पार्थिक संघवी यांनी पत्रकार परिषदेत दिला.