Breaking News

पुढील वर्षी भारताचा विकासदर ८ टक्के!


मागील तिमाहीत भारताने ५.७ टक्के दराने विकास साधला असला तरी पुढील म्हणजेच २०१९ आर्थिक वर्षात भारत चक्क ८ टक्के दराने विकास साधेल, असे भाकित गोल्डमॅन सॅक्स या जगविख्यात इनव्हेस्टमेंट बँक आणि वित्तीय सेवा संस्थेने व्यक्त केला आहे. 

तसेच या संस्थेने भारत वर्तमान आर्थिक वर्षात ६.४ टक्के दराने विकास साधेल, असा ताजा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. देशातील बँकांना सरकार भांडवल पुरवठा करणार असल्यामुळे गुंतवणूक आणि कर्जवाटपात वाढ होईल. परिणामी विकासाला चालना मिळेल, असे स्पष्टीकरण देखील गोल्डमॅन सॅक्सने दिले आहे. .

भारत सरकारने आखलेली बँकांच्या वित्तपोषणाची योजना जर व्यवस्थितपणे राबवण्यात आली तर या योजनेत भारतीय अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर पुन्हा गतिमान करण्याचे सामर्थ्य आहे. कारण वित्तपोषणामुळे कमकुवत बँकिंग क्षेत्राच्या रूपाने असलेली विकासातील अडचण दूर होऊ शकणार आहे, असे गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.