काळ्या बाजारात जाणारा साडेपाच लाखचा गहू, तांदूळ पकडला
बीड, दि. 07, नोव्हेंबर - गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत बीड गुन्हे शाखेने नवगण राजुरी फाट्यावर सापळा रचून ट्रकमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा जवळपास साडेपाच लाख रुपयांचा गहू आणि तांदूळ पकडला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बीड तालुक्यातील मुर्षदपूर येथून ट्रक क्र. चक 11 च् 6233 मधून रेशनसाठीचा तांदूळ आणि गहू काळ्या बाजारात विक्रीला निघाला असून सदर ट्रक पाटोदा मार्गे जाणार असल्याची गुप्त माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी क्षीरसागर, सारूक, बांगर, हांगे, रुपनर यांनी बीड - अहमदनगर रोडवर नवगण राजुरी फाटा येथे सापळा रचून सदरील ट्रकला चौकात अडविले. पोलिसांनी ट्रकचालकाकडे चौकशी केली असता त्याने मुर्षदपूर येथील बापूसाहेब जगताप यांच्या घरून रेशनचा गहू आणि तांदूळ घेऊन पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील उद्धव रामभाऊ घोडके याच्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांसोबत असलेल्या पंचांनी ट्रकच्या मागील भागाचे झडती घेतली असता आतमध्ये त्यांना एक कदम स्वच्छता की ओर’ लिहिलेले अंदाजे 5 लाख 36 हजार 460 रुपयांचे गहू आणि तांदळाचे एकूण 271 पोते आढळून आले. ट्रकसहीत सर्व माल जप्त करण्यात आला असून ट्रकमधील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरील गहू आणि तांदळाचे नमुने पुढील कार्यवाहीसाठी सीलबंद करून ठेवण्यात आले आहेत.
