लातूरला स्वतंत्र विद्यापीठ देण्याची मागणी
लातूर, दि. 11, नोव्हेंबर - लातूरला स्वतंत्र विद्यापीठ मंज़ूर करावे अशी मागणी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृति समितीच्या वतीने लातूर आ.अमित देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कल्पक़तेतून व लातूरकराच्या आग्रही मागणीतून विद्यार्थ्याना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड़चीं पायपीट करावी लागू नये, या उद्धेशाने 2010 मध्ये पेठ (लातूर) येथे विद्यापीठ उपकेंद्र सुरु करण्यात आले. या उपकेंद्रात एक संचालक, 13 प्राध्यापक, 5 विभाग, अन्य कर्मचारी आणि भव्यदिव्य प्रशासकीय इमारत उपलब्ध आहे. या उपकेंद्रात चालणा-या अभ्यास केंद्रातून शैक्षणिक वार्षिक शुल्क जवळपास 80 लाख ते 01 कोटी रुपये नांदेड़ विद्यापीठाकड़े जमा होतात. पण उपकेंद्राच्या दैनंदिन ख़र्चासाठी अल्प तरतूद करण्यात आली आहे. शिवाय रस्ते नीट नाहीत, पाणी हवे तेवढे मिळत नाही. अन्य महत्वपूर्ण सेवांची कमतरता आहे. लातूर जिल्हयात कला, वाणिज्य, विज्ञान, औषध निर्माणशास्त्र, विधी, अभियंत्रिकी, वैद्यकिय महाविद्यालये अशी जवळपास 140 महाविद्यालये आहेत. त्यांचे प्रशासकिय व शैक्षणिक कामाचे स्वरूप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालकांना आजही नांदेडला जावे लागते. शेजारच्या सोलापूर जिल्हयात महाविद्यालयाचीं संख्या 100 च्या आत असूनही विद्यार्थी, कर्मचारी यांच्या सोयीसाठी सोलपूरला शासनाने स्वतंत्र विद्यापीठ दिले आहे. लातूर ज़िल्हा शैक्षणिक व अन्य क्षेत्रात लातूर पर्यटनामुळे नावा आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी, प्राध्यापक यांची शैक्षणिक ग़ैरसोय टाळण्यासाठी लातूर स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
