मानार, विष्णुपुरीच्या पाणी नियोजनासाठी आ. धोंडगे यांचे ठिय्या आंदोलन
नांदेड, दि. 11, नोव्हेंबर - पूर्ण क्षमतेने भरलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्पातुन रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन अद्याप करण्यात न आल्याने त्याचा निषेध करत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात आज सकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांना निवेदन देवून दोन दिवसात पाणी सोडण्याची मागणी केली. तालुक्यातील लाभ क्षेत्र असलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाने 15 ऑक्टोंबर पुर्वी रब्बीच्या पाणी पाळ्याचे नियोजन करून पाणी सोडणे अपेक्षीत होते. मात्र, याबाबत पाटबंधारे कार्यालयाकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. यामुळे दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतक-यांनी 30 ऑक्टोंबर रोजी आंदोलन करत 5 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती. यावरही पाणी सोडण्यात आले नसल्याने आज माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी सकाळी अकरा वाजता पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
