Breaking News

बालकांना त्यांचे आभाळ द्या-जि.पो.उपअधीक्षक विष्णू ताम्हाणे


"मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत.मुलांमधील भारतीय घडविण्यासाठी प्रत्येक मोठ्या माणसाचे योगदान आवश्यक आहे.टीव्ही मोबाईलपासून दूर ठेवणे नव्हे तर सोशल मीडियाच्या पारतंत्र्यातून त्यांची सुटका करणे खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे.मुलांच्या पंखातील भरारी जोखण्यासाठी मुलांना त्यांचे आभाळ द्यावे "असे प्रतिपादन जि.पो. उपअधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक) विष्णू ताम्हाणे यांनी केले.

जी.एस.ढोरजकर फौंडेशनच्या वतीने बालदिनानिमित्त आयोजित बालभारत कलामहोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी श्री.ताम्हाणे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण,झीसारेगमप लिटल चॅम्पियन अंजली व नंदिनी गायकवाड,डॉ.अमोल बागूल, सीताराम ढोरजकर,नगरसेविका विना बोज्जा, प्रा.राहुल पाटोळे, श्रीनिवास बोज्जा,आदर्श ढोरजकर, पुष्पा ढोरजकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनानंतर मानपत्र व वृक्ष देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आकांक्षा ढोरजकर यांनी स्वागत केले तर सीताराम ढोरजकर यांनी प्रास्ताविकात फौंडेशनच्या शाळा व उपक्रमांबद्दल माहिती दिली.डॉ. बागूल यांनी गायिका गायकवाड भगिनींच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून त्यांच्या सांगितीक यशाचा प्रवास उलगडला.

श्री चव्हाण यांनी अभ्यास व उत्तम चारित्र्याबद्दल मुलांना सांगतानाच गायकवाड भगिनींना टॅबलेट भेट देण्याचे तर श्री.पाटोळे यांनी इंग्लिश बोलण्याच्या प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले.लिटल अंजल प्री स्कुल व साई इंग्लिश मेडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या सुमारे १४ कलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी सादरीकरण झाले.मान्यवरांच्या शुभहस्ते पालक व विद्यार्थ्यांचा यावेळी भेटवस्तू प्रदान करून सत्कार करण्यात आला.

जादूगार धनंजय वडीतके व विनोदी कलाकार अनिल पाटोळे यांनी देखील मनोरंजनातून प्रबोधन केले.अंश हावरे या विद्यार्थ्याचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा झाला तर कु. श्रेया गुगळे हिने राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रभक्तीपर घोषणा दिल्या.सुजाता नेलवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृन्दाने परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी असंख्य पालक,विद्यार्थी व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.