Breaking News

महानुभव पंथाचे जाती विरहित समाजरचना जोपासण्याचे योगदान स्तुत्य : खा. पवार

सातारा, दि. 14, नोव्हेंबर - संत गाडगेबाबा आणि महानुभव पंथाने समाजमन स्वच्छ करण्यासाठी घेतलेली भूमिका समान आहे. या प्रेरणादायी भूमिकेतून संत गाडगेबाबा आणि महानुभव पंथाने जातीविरहित समाजरचना जोपासण्यासाठी दिलेले योगदान स्तुत्य प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले.


फलटण येथील आबासाहेब मंदिर, चक्रपाणी जन्मस्थान आणि रंगशीळा मंदिराच्या जीर्णोध्दारानंतर या तीनही मंदिरांचे उद्घाटन रविवारी खा. शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, दादाराजे खर्डेकर, आ. दिपक चव्हाण, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, डॉ. इंद्रजित मोहिते, सुभाषराव शिंदे, डॉ. विजयराव बोरावके, प्रल्हादराव साळुंखे (पाटील) उपस्थित होते.
माणसाच्या आडनावावरून जात-धर्म किंवा पंथ स्पष्ट होतो. परंतू महानुभव पंथात संत महंतांची नावे गावावरुन येत असल्याने जात, धर्म, पंथ पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व जातीधर्माला बरोबर घेवून जाणारा आदर आणि आपुलकीची शिकवण देणारा धर्म म्हणून महानुभव पंथाची ओळख आहे. तसेच मराठी भाषा समृध्द करण्याचेही काम चक्रधर स्वामी आणि महानुभव पंथाने केले असल्याचे खा. शरद पवार यांनी स्पष्ट केले.
ब्रिटिशाविरुध्द भूमिका घेतल्याने आपल्या पूर्वजांना याच नांदवळमधून हद्दपार व्हावे लागल्याने ते फलटण येथे वास्तव्यास आले व नंतर काट्याचीवाडीत वास्तव्य केले. संकटकाळी येथे आश्रय मिळतो, असेही खा. शरद पवार यांनी सांगितले.ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण शहरात 9 व्या शतकात महानुभव पंथाची स्थापना झाल्याचे सांगून शहरात अनेक जाती-धर्माची लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असल्याचे सांगितले.