Breaking News

6 हजार किलोमीटरचा प्रवास 40 दिवसात पुर्ण

सातारा, दि. 14, नोव्हेंबर - मातृशक्ती, निसर्ग, तसेच स्त्री संरक्षण आणि त्यांच्या सन्मानाचा संदेश देत, लोणंदच्या प्रीतेश शशिकांत क्षीरसागर याने देशातील 13 राज्यांत सायकलवरुन सहा हजार किलोमीटर अंतराचा प्रवास 40 दिवसांत एकट्याने पूर्ण करण्याची किमया लोणंद येथील खोत मळ्यातील प्रीतेश शशिकांत क्षीरसागर या धाडसी युवकाने साधली आहे. त्याच्या या अनोख्या व धाडसी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


प्रीतेश क्षीरसागर याने दि. 1 ऑक्टोबर रोजी पुणे येथून हिंदुस्थान भ्रमंतीसाठी सायकलवरुन प्रवासाला प्रारंभ करुन तो दि. 9 नोव्हेंबर रोजी पुणे येथे पूर्ण केला. लोणंदच्या खोत मळ्यातील सेवानिवृत्त तालुका मास्तर (कै.) भुजंगराव क्षीरसागर यांचा नातू व पुणे पोलीस दलाच्या गुप्त वार्ता प्रबोधिनीत कार्यरत असणारे हवालदार शशिकांत क्षीरसागर यांचा मुलगा, प्रीतेशने बीएस्सी अ‍ॅग्री ही पदवी घेतल्यावर तो स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करीत आहे.
प्रीतेशने हा प्रवास मातृशक्ती, निसर्ग व स्त्री संरक्षण आणि त्यांच्या सन्मानाचा संदेश घेऊन पूर्णत्वास नेला. सायकलवरुन हिंदुस्थान भ्रमंती करीत सुमारे 6 हजार किलोमीटर अंतराचे सोनेरी चतुर्भुज (हिंदुस्थान भ्रमण) हा अनोखा उपक्रम कोणालाही बरोबर न घेता एकट्याने पूर्ण केला. या प्रवासात प्रीतेश दररोज सुमारे दीडशे किलोमीटर अंतर सायक लवरुन पार करत होता. महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्‍चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाना, राजस्थान, गुजरात असा 13 राज्यांचा प्रवास गुरुवारी दि. 9 पुणे येथे पूर्ण केला. प्रवासादरम्यान प्रीतेशचे तेरा राज्यांत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले, तसेच त्याच्या मुक्काम व जेवणाचीही सर्व ठिकाणी सोय करण्यात आली.