Breaking News

पक्षांच्या प्रजाती होतायेत नामशेष ; विविध दिन केवळ नावापुरतेच!


वाढत चाललेले कडक उन्हाचे चटके,निष्पर्ण होत असलेली झाडे-झुडुपे, आणि त्यामध्येच दुर्मिळ होत असलेले पाणीसाठे आदींमुळे मुक्या पशुपक्षी,वन्यप्राण्यांना आपला जीव वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पर्यावरणातील बदल,कृषी क्षेत्रातील आधुनिकीकरण. तसेच वाढते प्रदूषण आदी घटकांचा त्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलाने आपली पकड मजबूत केली आहे.आपल्या सुख-सुविधा वाढवण्यासाठी मानवाकडुन होत असलेली प्रचंड प्रमाणातील वृक्षतोड,शेतीतील यांत्रिकीकरण,कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर यामुळे निसर्गाची अपरिमित हानी होत आहे.जंगलतोड,वृक्षांची होणारी कत्तल,पशु-पक्षांची शिकार याचा विपरीत परिणाम हा वन्यप्राणी व पक्षांना भोगावा लागत आहे.पूर्वी शेकडो जातीचे पक्षी,झाडे पहावयास मिळायचे,पक्ष्यांच्या

किलबिलाटाने प्रसन्न सकाळ व्हायची.मात्र सध्या परिस्थिती उलट बनली आहे.मानवी संस्कृतीत पिंडाला शिवणारा कावळाही आता दुर्मिळ होऊन बसला आहे.याचाच परिणाम म्हणजे शासनाला अनेक पक्षांचे-प्राण्यांचे जागतिक दिन वर्षातून एकदा साजरे करण्याची वेळ आली आहे.मानवाने आपल्या स्वार्थासाठी सर्व सुख-सुविधा जागेवरच उपलब्ध करून घेतल्या. मात्र या मुक्या पशु-पक्षांचे काय?असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे.ग्रामीण भागात विहिरी,झाडे,अडगळीच्या खोल्या आदींमध्ये सुगरणीने विणकाम केलेली घरटी आढळून येतात मात्र ही विणकाम केलेली घरटी पक्षांविना रिकामी आहेत.डिजिटल युगात वाढणाऱ्या मुलांना सुगरणीने बांधलेली घरटी आपल्या लाखो रुपयांच्या बंगल्यापेक्षा आकर्षक वाटतात.त्यामुळेच अलिशान बंगल्यांमध्येही ही घरटी

अडकवलेली दिसून येत आहेत.शासनाने ठरवून दिलेल्या जागतिक चिमणी दिनाला अनेक सामाजिक संस्था,शाळा-महाविद्यालये आदींनी भरभरून प्रतिसाद दिला.यामध्ये पक्षांना धान्य-पाणी देवून हा दिन साजरा करण्यात आला.मात्र चिमणी बचावाच्या एका दिवसाने दुर्मिळ झालेली चिमणी पुन्हा दिसणार नाही. हे तेवढेच खरे आहे.त्यासाठी समाज जागृती होऊन प्रत्येकानेच याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

उन्हाच्या चटक्याने सध्या वन्यजीव,पशु-पक्षांची भटकंती सुरु झाली आहे.'कुणी पाणी देता का पाणी?अशी आर्त हाक मारणाऱ्या मुक्या जीवांना आता पाणवठे,थोडे धान्य देण्याची गरज आहे.आपला अधिवास सोडून हे वन्यजीव आपल्या जीवाची तमा न बाळगता थेट लोक वस्तीत येवू लागल्याने मोठे आश्चर्य आहे.वन्यजीवांचे संवर्धन व्हावे यासाठी शासन कार्य करत असताना देखील शासनाची उदासीनता या मुक्या जीवांच्या जीवावर बेतत आहे.जागतिक दिन साजरे करण्यापेक्षा प्रत्येक दिवशी नवीन जीव तयार होण्यासाठी शासन स्तरावर जागोजागी

पाणवठे,वृक्षलागवड मोहीम जलद गतीने सुरु होणे खुप गरजेचे आहे.शासनाने देखील अशा वन्यजीवांसाठी उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे.पुस्तकातील निर्जीव चिमणी,काऊला प्रत्यक्षात पाहण्यासाठी आताच्या डिजिटल युगातील चिमुरड्यांना आपणच प्रोत्साहन दिले. पाहिजे.निसर्गातील या जीवांना चारा व पाणी देवून जगवण्याची जबाबदारी आहे.त्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत.