Breaking News

पत्नीला जाळून ठार मारले; पतीला जन्मठेप

जामखेड तालुक्यातील महारूळी ( नान्नज ) ता. जामखेड येथील तुकाराम शिवराम ढेपे यांनी पत्नीला दारूच्या नशेत शिवीगाळ करून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. पत्नीला जाळून ठार मारल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एन. श्रीमंगले यांनी तुकाराम ढेपे यांना दोषी धरून जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.


या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील महारूळी (नान्नज) येथे आरोपी तुकाराम ढेपे व त्यांची पत्नी शोभा हे एकत्रित राहात होते दि. 15/9/2016 रोजी आरोपी तुकाराम ढेपे यांना दारूचे व्यसन होते. तो नेहमी प्रमाणे दारू पिऊन आला होता.त्याने घरात आल्यावर पत्नी शोभा हिस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्यावेळी शोभा हिने पतीला तुमचे रोजचेच आहे ?मला शिव्या कशाला देता असे म्हणाल्याचा राग पती तुकाराम याला आला. त्याने लगेच घरातील रॉकेलचा ड्रम घेऊन त्यातील रॉकेल पत्नी शोभाच्या अंगावर ओतून काडीपेटीने पेटवून दिले.आग लागल्याने तिने जोरजोरात आरडाओरडा केला तेव्हा तिची चुलत जाऊ वैजयंता ढेपे व शेजारी लोकांनी शोभा हिच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली. 

त्यात शोभाच्या चेहरा दोन्ही हात, छाती, पोट, पाय, भाजून ती गंभीर जखमी झाली होती. तिला शेजाऱ्यांनी उपचारार्थ प्रथम जामखेड येथील दवाखान्यात व नंतर नगरच्या सिटीकेअर हॉस्पिटल मध्ये त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे उपचार घेत असताना दि. 16/9/2016 रोजी शोभा हिचा सिटीकेअर हॉस्पिटल रूबी कॅथलॅब येथे नायब तहसीलदार एस. एस. पाखरे यांनी डॉ. प्रशांत कुलकर्णी यांच्या तपासणी अंती मृत्यूपूर्व जबाब घेतला होता. तसेच जखमी शोभा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना सहाय्यक फौजदार जे. जी. बटुळे यांनी डॉ. आश्विनी सोनवणे यांच्या तपासणीअंती दि. 16/9/2016 रोजी मृत्यूपूर्व जबाब घेतला त्यानंतर दि. 19 /9/2016 रोजी शोभा मयत झाली. 

 मयताचे शवविच्छेदन डॉ. मनोज घुगे यांनी केले या गुन्हयाचा तपास जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक संजय मांतोडकर यांनी केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकुण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार वैजयंता ढेपे व उत्तम ढेपे हे घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असताना केवळ आरोपी त्यांच्या नातेवाईक असल्याने त्यांनी सरकार पक्षाला मदत न केल्याने त्यांना फुटीर म्हणून घोषित करण्यात आले. 

 सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या इतर साक्षीदारांनी दिलेली साक्ष दाखल कागदपत्रे आणि परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तुकाराम ढेपे याला जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एड. केदार, गोविंद केसकर यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील एड सतीश पाटील, एड. अंनत फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. तसेच एड. केसकर यांना सरकारी वकील एड. अनिल सरोदे, एड. राहुल पवार, पोलिस कर्मचारी यादव यांनी मदत केली.--