Breaking News

लिंगायत महामोर्चानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार - जयंत पाटील


सांगली, दि. 30, नोव्हेंबर - सोशिक लिंगायत समाज धर्म मान्यतेसह अन्य विविध मागण्यांसाठी लिंगायत समाज बांधवांच्यावतीने रविवार 3 डिसेंबर रोजी आयोजित लिंगायत महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यांना पाठबळ देण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद त्यांच्या पाठिशी उभी केली जाईल. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सांगलीत रस्त्यावर उतरतील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील यांनी दिली.

लिंगायत महामोर्चा समन्वय समितीसमवेत इस्लामपूर येथे झालेल्या बैठकीत जयंत पाटील बोलत होते. या बैठकीस दिल्ली पीठाचे पीठाचार्य चन्नबसवानंद महास्वामीजी, सांगली जिल्हा लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने, संचालक सुशील हडदरे व अविनाश भोसीकर आदी उपस्थित होते.

व्यापारी व कष्टकरी असलेल्या लिंगायत समाजाने आजवर कधीही कोणत्याही सरकारकडून अपेक्षा केलेली नाही. परंतु अन्य धर्मियांप्रमाणेच लिंगायत समाजाची गेलेली धर्म मान्यता मिळणे हा त्यांचा मुलभूत हक्क आहे. अल्पसंख्याक दर्जा व लिंगायत समाजातील अनेक उपेक्षित पोटजातींसाठी आरक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आता देशभरात अनेक राज्यात या आंदोलनाचा एल्गार सुरू आहे. 

सांगली येथे आयोजित महामोर्चा ही राज्य व केंद्र शासनाला जाग आणण्यासाठीच एक व्यापक धडक आहे. त्यात राष्ट्रवादी का ँग्रेसचे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने ताकदीने सहभागी होणार आहे. आपणही सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. या बैठकीत उपस्थित वाळवा तालुक्यातील सर्वच लिंगायत समाजबांधवांनी हा महामोर्चा न भूतो न भविष्यती असा करण्याचा निर्धार व्यक्त केला.