सोमवारी बाजार समिती गेटबंद आंदोलन करणार : संदेश कार्ले

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्ड येथील मुख्य बाजारात चालणारा ऊस व कडबा बाजार नेप्ती उपबाजार समितीत हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बाजार समितीच्या या निर्णयाला शेतकर्‍यांनी विरोध दर्शवला असून बुधवारी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी आंदोलन करून सदर निर्णय रद्द करण्याची मागणी केली. 


आंदोलकांनी बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले, रेवणनाथ चोभे यांची भेट घेवून निवेदन दिले. दरम्यान, ऊस व कडबा बाजार नेप्ती उपबाजारात हलवल्यास सोमवार {दि.२०} बाजार समिती चौकात रास्तारोको करून गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा जि. प. सदस्य कार्ले यांनी यावेळी दिला.

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने ऊस व कडबा बाजार नेप्ती उपबाजार समितीत हलविण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. हा बाजार मुख्य बाजार समितीतून हलवला गेल्यास शेतकरी व खरेदीदार दोघांनाही टनामागे ८०० ते १ हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. 

नेप्ती उपबाजार लांब अंतरावर असून तालुक्यातून येणार्‍या शेतकर्‍यांवर माल वाहतूकीच्या वाढीव खर्चाचा बोजा पडणार आहे. बाजार समितीकडून शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची अपेक्षा असताना सध्या शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडणारे निर्णय घेतले जात असल्याची टिका कार्ले यांनी यावेळी केली. 

आंदोलनात रमेश इनामकर, सावळेराम आवारे, अशोक तोरडमल, शिवाजी दुसुंगे, भाऊसाहेब भोसले, शरद कराळे, काशिनाथ पोटे, उध्दव बोठे, बाळासाहेब कराळे, बाबुराव मोकाटे, गोपीनाथ जाधव, बाबासाहेब मोकाटे, बाळासाहेब आवारे, प्रकाश मोकाटे, रावसाहेब वाणी आदी शेतकरी सहभागी झाले होते.