Breaking News

मराठी अस्मितेचे राजकीय दास्यत्व...

दि. 02, नोव्हेंबर - राष्ट्र , प्रांत, भाषा, धर्माचरण याविषयी अस्मिता जपणे त्याज्य नाही. या अस्मितेला पुन्हा परस्पर विरोध करणारी सीमाही निषेधार्ह आहे.अस्मिता जपणे प्रत्येकाचे  आद्य कर्तव्य मानायला हवे. माञ ही अस्मिता जेंव्हा एखाद्या विशिष्ट विचारांची, थेट सांगायचे म्हटले तर राजकारणाची बटीक बनते किंबहूना धर्मांध कट्टरतेची दासी बनते तेंव्हा कु णाच्याही हातचे खेळणे बनण्यास ती राजी होते. त्याचा फटका या अस्मितेसाठी पिढ्या उध्वस्त करणार्या एका मर्यादीत वर्गाला बसतो. तो वर्ग एकटा पडतो. एकाकी लढणार्या या  आस्मितेचे खरे पाईक असलेल्या मंडळींना मोठी किंमत मोजावी लागते जी आज कर्नाटकातील मराठी बांधव मोजत आहे.
भाषावर प्रांत रचना स्वीकारल्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांच्या स्वार्थी, सत्तालोलूप प्रवृत्तीतून अशा प्रकारचे सीमावाद उद्भवले आहेत हे वेगळे सांगृण्याची गरज नाही.
कर्नाटक सीमावादाला कोण कारणीभूत आहे, याचा या ठिकाणी उहापोह करण्याची आवश्यकता नसावी. या प्रश्‍नाच्या जेव्हढे खोलात जाऊ तेव्हढे कंगोरे समोर येतील. नैसर्गीक  नियमाप्रमाणे होणार्या बहुतांश प्रश्‍नांना तत्कालीन राज्यकर्तेच ओघानेच जबाबदार ठरतात.या निकषावर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पाप आपल्याला काँग्रेसच्या माथ्यावर सहजपणे  लादता येईल.
या प्रश्‍नाला जेव्हढी काँग्रेसनिती जबाबदार आहे, तेव्हढीच किंबहूना त्यापेक्षा अधिक प्रमाणात काँग्रेसचा विरोध करणार्या सर्व राजकीय पक्षांनी या प्रश्‍नावर बेजबाबदारपणे केलेले राजक ारण कारणीभूत आहे. हे नाकारता येणार नाही.
कर्नाटक असो नाही तर महाराष्ट्र या राज्यांनी निर्माण केलेला वाद त्यांच्या पातळीवर योग्य असेलही,पण ज्यांच्यासठी हा वाद चिघळला जात आहे,त्या भुमीपुञांच्या भावनांचा विचार  कुठलीच बाजू करतांना दिसत नाही. उलटपक्षी हा वाद अधिक कसा चिघळता ठेवता येईल आणि तापलेल्या वातावरणात आपली राजकीय पोळी कशो भाजून काढता येईल यावर  सर्व राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मिता समोर ठेऊन राजकारण करण्यात शिवसेना आघाडीवर आहे.मराठी माणूस केंद्रबिंदू ठेवून समाजकारण सुरू केलेली  शिवसेना हिंदूत्वाच्या नादाला लागून प्रादेशिक अस्मितेशी फारकत घेण्याच्या मार्गाला निघाली असतांना तोच मुळ मुद्दा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाला. भाऊबंदकी हा  आजचा विषय नृसल्याने अन्य बाबी कटाक्षाने टाळत अस्मितेवर प्रकाशझोत टाकीत आहोत. हे या ठिकाणी मुद्दामहून नमूद करणे इष्ट.
प्रादेशिक आणि मराठी माणसाच्या अस्मितेला चुचकारून शिवसेना हिंदूत्वाच्या मुद्यावर आक्रमक होऊ लागल्यानंतर हळूहळू मराठी माणूस अडगळीत पडला. मनसेने मराठी मानसाची  अस्मिता उचलून ती उणिव भरून काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
शिवसेना असो की मनसे या दोघांनीही मराठी अस्मिता केवळ महाराष्ट्रापुरती त्यातही मुंबईपुरती मर्यादीत ठेवून तिचा सोयीनुसार वापर करण्याचे तंञ विकसीत केले.किंबहूना या मराठी  अस्मितेने या दोन्ही पक्षांच्या राजकारणाचे दास्यत्व स्वीकारले.
ही मंडळी महाराष्ट्र सोडा मुंबई सोडायला तयारा नाही, मग मातोश्री किंवा कृष्णकुंज पासून शेकडो मैल दूर असलेल्या मराठी मनांचा आक्रोश कसा पोहचणार? स्वतःला अभिमानाने  मराठी म्हणविणार्या बेळगावच्या कुशीतील मराठी बांधव या स्वार्थी राजकारण्यांच्या फाजीलपणामुळे एकाकी पडले आहेत. अन्य राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर या मराठी भावनांना  सुरूवातीपासून स्थान नाही म्हणून मराठी अस्मितेचा झेंडा फडकावणार्या मंडळींच्या आहारी गेलेली आमची अस्मिता इथेही पाला पाचोळ्यासारखी कुस्करली गेली. या वेदनांवर फुंकर  घालण्याची सद्बुध्दी आई भवानी मराठी अस्मितेच्या ठेकेदारांना एव्हढीच प्रार्थना.