Breaking News

गुन्हेगारीसाठी विद्यार्थी ‘बॉन्ड’ नशेच्या जाळ्यात

पुणे, दि. 23, नोव्हेंबर - शहरात ‘बॉन्ड’च्या नशेच्या विळख्यात अडकलेले अनेक तरूण शालेय विद्यार्थ्यांना या नशेच्या पाशात ओढत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. काही तरूणांनी या नशेचे प्रात्यक्षिक दाखविले. नशेच्या आधीन झाल्यावर या विद्यार्थ्यांना सहजपणे गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढण्यात येते अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. डोक्यावर पित्याचे छत्र नसलेली आणि सर्वसामन्य व गरीब कुटुंबातील मुले त्यामुळेच ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरू लागली आहेत.


दोन दिवसांपूर्वी केलेल्या एका पाहणीत शितळानगर रस्त्यावरील एका शाळेच्या आवारात सीमाभिंतीलगत दाट झुडूपांमध्ये सात-आठ विद्यार्थ्यांचा घोळका बॉन्डची नशा करताना दिसून आले. या विद्यार्थ्यांची कौटुंबिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, हे सर्व विद्यार्थी गांधीनगर, शितळानगर, साईनगर भागातील असल्याची माहिती मिळाली. यातील एकाचा सांभाळ आजी करत असून दोघांची आई मजुरीची कामे करून संसार चालवित असल्याचे समजले.

पण अन्य दोघांचे मातापिता मजुरीनिमित्त दिवसभर घराबाहेरच असतात, अशी माहिती मिळाली. ही मुले नशेच्या आहारी गेली आहेत. दुपारी शाळा सुरू होताच हे काही कारण सांगून बाहेर पडतात. किंवा शिक्षकांची नजर चुकवून बाहेर पडतात. सीमाभींतीलगत उंच गवताच्या आड बसून आधी सिगारेटचा धूर काढला जातो. त्यानंतर काहीवेळात बॉन्डचे डबे काढले जातात, मग सुरु होतो नशेचा खेळ. काहीवेळातच नशेचा अंमल सुरू होतो, आणि ते स्वतःवरील नियंत्रण हरवून बसतात. या तंद्रीत त्यांच्याकडून कुठलेही कृत्य करून घेणे सहज शक्य असते, असे जाणकार सांगतात. बॉन्डचा प्रकार विद्यार्थ्यांमध्ये सहजपणे रूजत चालला असल्याचे चित्र आहे.
किंबहुना कोवळ्या मुलांना अंमली पदार्थांची विक्री, वाटमारी किंवा चोरीसारख्या गुन्ह्यात ओढण्यासाठी अशा नशेचे आदी करण्याचाप्रकार रुजत चालला आहे. गुन्हेगार प्रवृत्तीची काही मंडळी आवर्जुन मुलांना असे प्राणघातक नशिले पदार्थ उपलब्ध करून देत आहेत. एखादा गंभीर गुन्हा त्यांच्या हातून घडलाच तर वयाचा विचार करून त्यांना शिक्षा कमी होते. त्यामुळेच शाळकरी विद्यार्थी अशा मंडळींकडून टार्गेट केले जात असल्याची माहिती आहे.