पैठण बसस्थानकामागील अतिक्रमणे जमीनदोस्त
औरंगाबाद, दि. 09, नोव्हेंबर - पैठण- राज्य परिवहन महामंडळाच्या पैठण बसस्थानकाच्या पाठीमागील जागेवर असलेले जवळपास 100 अतिक्रमण आज सकाळी नगर परिषद, तहसील प्रशासन तसेच पोलिसांच्या जम्बो पथकाने जमीन दोस्त केले या ठिकाणावर अनेक वर्षांपासून पक्के अतिक्रमण झाले होते. सकाळी झालेल्या या अतिक्रमण विरोधी कारवाई मुळे अतिक्रमण धारकांची चांगलीच धावपळ उडाली. पैठण शहराच्या मध्यभागी मोठे बसस्थानक आहे याठिकाणी वर्कशॉपच्या दक्षिण भागातील स्थानकाच्या जवळपास तीन एकर जागेवर अनेक वर्षापासून मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले होते. एसटीच्या मालकीची जागा असल्याने आज अखेर नगरपरिषद प्रशासन, तहसील प्रशासन व पोलीस शासनाच्या संयुक्त जम्बो पथकाने अतिशय चांगले नियोजन करुन एसटीच्या मालकीची तसेच अन्य जागांवर असलेले सुमारे 100च्या आसपास अतिक्रमणे भुईसपाट केली आहे. यामध्ये काही घरांचा देखील समावेश आहे. या जागेवर अनेक वर्षांपासून एक व्यक्ती पैसे घेऊन अतिक्रमित जागांवर लोकांना प्लॉट देत असे याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, तसेच या ठिकणी अनेक बेरोजगारांनी आपली उपजीविका चालवण्यासाठी आपली दुकाने टाकली होती ही दुकाने आजही जमीनदोस्त करण्यात आले. प्रशासनाने आम्हाला पर्यायी जागा द्यावी अशी मागणी संतोष जाधव यांनी केली आहे. या कारवाईच्या वेळी आगार तहसीलदार महेश सावंत, नप मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, प्रमुख अमोल भुसारी, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, भगवान कुलकर्णी आदींसह रॅपिड एक्शन फोर्सच्या कर्मचा-यांचा सहभाग होता.
