Breaking News

समाज व भरकटलेला तरुण या विषयावर वानखेडेंचे व्याख्यान

बुलडाणा, दि. 01, नोव्हेंबर - दि .26 ऑक्टोबर रोजी साठेगाव   येथे किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांना पदोन्नति मिळून बदली झाल्यामुळे साठेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी गावातील ग्रामस्थांना व तरुण मुलांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी सांगितले की  आज कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. वडील घरात तर मुलं बाहेर असे चित्र घराघरांत बघायला मिळते. मुलं हीच पालकांची खरी संपत्ती असून त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने कुटुंबासाठी वेळ काढला पाहिजे, असे आवाहन ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी केले. साठेगाव येथे समाज व  भरकटलेला तरुण या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. सरपंच अर्जुनराव नागरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना वानखेडे म्हणाले, तरुण वर्गात व्यसनाधीनता वाढली आहे. मुलं अभ्यास सोडून तासनतास मोबाईलवर लागलेली असतात. पालकही मुलांना खुशाल महागडी मोबाईल घेऊन देतात. आपला पाल्य काय करतो, कुठे जातो, कुणासोबत राहतो याबाबत पालकांनी जागृत राहले पाहिजे. त्यांच्यासोबत मित्राप्रमाणे मिळून मिसळून वागा.
हसत खेळत संवाद साधून मनातल्या गोष्टी जाणून घ्या. आदेश न देता समजून घेऊन त्यांच्यावर योग्य ते संस्कार करा, असा सल्ला त्यांनी  यावेळी दिला. पोलीस ठाण्यात वडील व मुलांच्या कशा तक्रारी येतात याची एक दोन उदाहरणे त्यांनी सांगितली.  गावकर्‍यांच्या वतीने शाल, पुस्तक व एक रोपटे देऊन वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक अनिल झोटे यांनी केले.