Breaking News

शिवसेनेचा बँक अधिकार्‍यांना घेराव

बुलडाणा, दि. 01, नोव्हेंबर - महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा केली;  मात्र सदर घोषणा फसवी ठरली. त्यामुळे  शिवसेनेचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या आदेशावरून त्या घोषणेच्या अनुशंगाने शिवसेना शहर प्रमुख संजय मेहेत्रे यांचे नेतृत्वाखाली 30 ऑक्टोबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला घेराव घालण्यात आला. तेव्हा एकाही शेतकर्‍याची कर्जमाफी झाली नसून, मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणा असल्याची बाब उघड झाली आहे.
शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्याचा लाभ किती शेतकर्‍यांना झाला, हे पाहण्यासाठी संजय मेहेत्रे, अक्षय केळकर, शिवप्रसाद ठाकरे, कैलास मेहेत्रेसह शिवसैनिकांनी व शेतकर्‍यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेला घेराव घातला. तेव्हा बँकेचे व्यवस्थापक एस.डी. धडाडे यांनी आंदोलकांना सांगितले की, या शाखेमधून तीन हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र असून, तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला; परंतु आजपर्यंत एकाही शेतकर्याच्या खात्यात कर्जमाफीचा एक रुपयादेखील जमा झालेला नाही. तसेच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दहा-दहा हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. तेसुद्धा तीन हजार कर्जदारापैकी फक्त पाच शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. शासनाने कर्जमाफीची फसवी घोषणा केली असून, त्याचा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे संजय मेहेत्रे, अक्षय केळकर, कैलास मेहेत्रे, शिवप्रसाद ठाकरे, आतीष ठाकरे, सतीश राजमाने, हभप नारायण मेहेत्रे, छोटू पवार, नारायण वाघ, दीपक भालेराव, संजय व्यवहारेसह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.