Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा आता 12 नोव्हेंबरला

बुलडाणा, दि. 01, नोव्हेंबर - दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या मार्फत घेण्यात येणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 5 नोव्हेंबर रोजी होणार होती; मात्र काही तांत्रिक अडचणी व दिवाळीच्या सुटीचा कालावधी विचारात घेता सदर परीक्षा 5 नोव्हेंबरऐवजी 12 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. 
दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.पर्यंत दर महिन्याला शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये अकरावी आणि बारावीसाठी 1 हजार 250 रुपये, पदवी तसेच पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिमहिना 2 हजार रुपये आणि पीएच.डी.च्या चार वर्षांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. दहावीत शिकणारा किंवा सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणारा विद्यार्थी ज्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल, असे कोणीही ही परीक्षा देऊ शकतात. राज्यातील 366 विद्यार्थी राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 13 सप्टेंबर 4 ऑक्टोबर ठेवण्यात आला होता; परंतु त्यात काही तांत्रिक अडचणीमुळे बदल करून 20 सप्टेंबरपासून 7 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नियमित आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी ठेवण्यात आला. त्यामुळे 5 नोव्हेंबरला  होणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) पुढे ढकलण्यात आली आहे. ऑनलाइनच्या तांत्रिक अडचणी व दीपावली सुटीचा कालावधी विचारात घेता सदर परीक्षा आता 12 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
शालेय क्षमता चाचणीवर भर!
राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 200 गुणांची असून, त्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी, भाषा चाचणी (मराठी किंवा इंग्रजी) व शालेय क्षमता चाचणी अशा तीन विषयांचा समावेश आहे; मात्र बौद्धिक क्षमता व भाषा चाचणीपेक्षा  शालेय क्षमता चाचणी या  विषयावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यात बौद्धिक क्षमता चाचणीला 50 गुण व 50 प्रश्‍न आणि भाषा चाचणीलासुद्धा 50 गुण व 50 प्रश्‍न राहणार आहेत; मात्र या शालेय क्षमता चाचणी या विषयावर 100 गुण व 100 प्रश्‍न ठेवण्यात आले आहेत. पात्रतेसाठी 40 टक्क्यांची आवश्यकता राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील पात्रतेसाठी संवर्गनिहाय टक्केवारी ठेवण्यात आली आहे.
त्यामध्ये  बौद्धिक क्षमता चाचणी, भाषा चाचणी (मराठी किंवा इंग्रजी) व शालेय क्षमता चाचणी या प्रत्येक विषयांमध्ये पात्रतेसाठी जनरल संवर्गासाठी 40 टक्के गुण व एस.सी., एस.टी आणि अपंग प्रवर्गासाठी 32 टक्के गुण आवश्यक आहेत. यापेक्षा कमी गुण मिळविणारे विद्यार्थी अपात्र ठरविण्यात येणार आहेत. भाषा विषयाचे गुण पक्त उत्तीर्णतेसाठी विचारात घेतला जाणार आहेत. अंतिम निवड यादीमध्ये या गुणांचा विचार केला जाणार नाही.