Breaking News

सिंदखेड राजात सापडली इंग्रजकालीन चांदीची 258 नाणी

बुलडाणा, दि. 01, नोव्हेंबर - सिंदखेड राजा येथील सोमवारपेठ भागात जुन्या पडीक जागेवर बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरु असताना इंग्रजकालीन चांदीची 258 नाणी सापडल्याची घटना आज सकाळी 12 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सदर नाण्यांची बाजारभावाने किंमत 1 लाख रु.च्या जवळपास आहे.पोलीस  यंत्रणेने वेळीच धाव घेतली नसती तर नाणी हाती लागली नसल्याची चर्चा गाव परिसरात आहे.
येथील सोमवारपेठ भागात विलास देविदास टाक व स्व. चिमण अण्णा देशमाने जैन यांच्या मालकीची ओसाड पडीक अशी जागा आहे. सदर ठिकाणी बांधकाम करायचे असल्याने खोदकाम सुरु होते. सदर खोदकाम सुरु असतांना आज दुपारी 12 वा. च्या सुमारास मजुरांना एक मडके आढळुन आले. त्यात चांदीची नाणी असल्याचे दिसल्यावर मजुरांनी त्यावर उड्या मारल्या. हे दृश्य पाहत आजूबाजूच्यांनीही तेथे धाव घेतली. त्यावेळी काहींनी नाणी पळविल्याची घटना घडल्याची चर्चा झाली. त्याचवेळी निनावी फोनद्वारे पोलिसांना ही घटना कळविण्यात आली.
ठाणेदार बळीराम गीते, पीएसआय संतोष नेमणार, सिंगनवाड पोलीस कर्मचारी राजू घोलप, नंदलाल खार्डे, रामदास वैराळ, सुनिल खेडेकर, अरुण मोहिते, जिंतेंद्र जाधव , शैलेश जाधव ,वाहनचालक उल्हास कुडे आदि पोलीस कर्मचार्‍यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. मागोमाग उपविभागीय अधिकारी (महसूल) विवेक काळे, तहसीलदार संतोष कणसे नायब तहसीलदार हरी वीर , प्रशांत वाघ ,बनकर , ताठे, आदिंनीही घटनास्थळ गाठले. त्यावेळी इंग्रजकालीन 1 नाणी  11 ग्रॅम वजनाची चांदीची असून एकूण 258 नाणी आढळून आली. सदर नाणी सन 1837 ते 1917 दरम्यानच्या काळातील आहेत. या ठिकाणी आणखी नाणी असावीत या शंकेच्या समाधानासाठी जेसीबी बोलावीत खोदकाम करण्यात आले. मात्र हाती काहीच लागले नाही. घटनेचा पंचनामा करीत नाणी जप्त करण्यात आली आहेत. बाजारभावाने या नाण्यांची किंमत  1 लाख 3 हजार 200 रु. आहे. याप्रकरणी पुढील कारवाई ठाणेदार बळीराम गीते व सहकारी करीत आहेत. खोदकाम करतांना मजुरांना नाणी सापडली, मात्र त्यावेळी उपस्थित इतरांतील ज्यांना नाणी मिळाली नाही त्यांनी पोलिसांना कळविले असावे, अशी चर्चा गाव परिसरात वेग घेत आहे. त्यामुळे सखोल चौकशीची गरज निर्माण झाली आहे.