बँक ऑफ महाराष्ट्रचे लुटलेले 70 लाख सापडले
सोलापूर, दि. 03, ऑक्टोबर - सांगोला- पंढरपूर रस्त्यावरील खर्डी गावाजवळ बँक ऑफ महाराष्ट्रची 70 लाखांची रोकड लुटणार्या आरोपींचा शोध लावण्यात सोलापूर ग्रामीण पो लिसांना यश आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सांगोला शाखेचा व्यवस्थापक अमोल भोसले हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. रात्री उशीरा पोलिसांनी मंगळवेढ्यातील एका गावातून 70 लाख रुपये ताब्यात घेतले आहेत.पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अमोल भोसले याच्यासह चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.बँक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेचे व्यवस्थापक अमोल भोसले हे आपल्या खासगी चारचाकीतून रोख 70 लाख रुपये घेऊन पंढरपूरकडे निघाले होते. दुपारी दीडच्या सुमारास वाहन हॉटेल संगमजवळ येताच दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी बोलेरो गाडीने भोसले यांच्या गाडीला कट मारला. त्यानंतर त्यांनी कारच्या खिडकीची काच फोडून वाहनचालक व भोसले यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. विशेष म्हणजे इतकी मोठी रक्कम नेताना वाहनाबरोबर एकही सुरक्षा रक्षक नव्हता, तर चोरांच्या गाडीत चार जण असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.भोसले यांनी घटनास्थळावरून पोलिसांना माहिती न देता थेट पंढरपूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती. मात्र एवढी मोठी रक्कम खासगी वाहनातून घेऊन जाता येते का? सोबत बंदूकधारी सुरक्षारक्षक कसा नव्हता? असे अनेक प्रश्न पुढे आले होते.
