Breaking News

जागतिक अपंग दिनानिमित्त 3 डिसेंबरला अनामप्रेमचा दिव्यांग रोजगार मार्गदर्शन मेळावा

येत्या रविवार दि.3 डिसेंबर 2017 रोजी सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेच्या सत्यमेव जयते ग्राम येथे जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे.यावेळी दिव्यांग प्रवर्गातील अंध- अस्थिव्यंग यांना आधार साहित्य वाटप केले जाणार आहे. यामध्ये पांढरी काठी, गॉगल, कुबड्या, आदी साहित्य गरजूंना मोफत वितरित केले जाणार आहे.



चाकाची खुर्च्या, 3 चाकी सायकल, या साहित्याबाबत यावेळी नोंदणी केली जाणार आहे.स्नेहालय परीवाराच्या सत्यमेव जयते ग्राम, वैष्णव माता मंदिरा जवळ, निंबळक गाव,ता.जि.अहमदनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

तसेच या कार्यक्रमात “ स्पर्धा परीक्षाद्वारा दिव्यांगाना रोजगार संधी” या विषयांवर यशोवाणी या अभूतपूर्व संकल्पनेच्या प्रणेत्या मा. प्राची गुजर मॅडम, पुणे यांचे अभ्यास पूर्ण व्याख्यान यावेळी उपस्थित दिव्यांगाकरिता आयोजित केले आहे. महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगांसाठी अनामप्रेमद्वारा युथ फॉर जॉब नोकरी प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. या केंद्राद्वारा बेरोजगार दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग चालवले जातात.

2 महिने चालणा-या या प्रशिक्षण वर्गातून मागील वर्षभरात 240 दिव्यांगांना नोक-या मिळाल्या आहेत.येत्या रविवार व सोमवार दि.3 व 4 डिसेंबर रोजी स्नेहालयाच्या अनामप्रेमने बेरोजगार दिव्यांगांसाठी प्रशिक्षणपूर्व मुलाखतीचे आयोजन केले आहे. तरी राज्यातील गरजू दिव्यांगांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनामप्रेमचे सचिव सुभाष शिंदे, अध्यक्ष अजित माने, विश्वस्त नाना भोरे ,किशोर कुलकर्णी ,रामेश्वर फटांगडे,निलेश शिंदे , राधा कुलकर्णी यांनी केले आहे.

आधार साहित्य मिळण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असणार आहे. तरी गरजू दिव्यांगानी7350013803, 9011020174 या क्रमांकावर संपर्क करावा,किवा अनामप्रेम, स्नेहालय भवन मागे,गांधी मैदान अहमदनगर येथे प्रत्यक्ष भेटावे.