रत्नागिरी जिल्ह्यात सात वर्षांत 37 बिबट्यांचा मृत्यू
रत्नागिरी, दि. 24, नोव्हेंबर - 23 नोव्हेंबर, (हिं. स.) : बेसुमार सुरू असलेली जंगलतोड आणि शिकारीसाठी लावण्यात येणा-या फासक्या बिबट्यांच्या मुळावर उठू लागल्या आहेत. गेल्या 7 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 23 ठिकाणी बिबटे फासकीत अडकले. त्यातील 8 बिबट्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या 7 वर्षात विविध कारणांनी 37 बिबटे मृत्युमुखी पडल्याची आकडेवारी वनविभागाने दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बेसुमार जंगलतोड सुरू आहे. लागवडीच्या नावाखाली डोंगर ओस केले जात असतानाच आता तर रस्त्याशेजारच्या झाडांनाही पैशांसाठी तोडले जात आहे. या सर्व गोष्टींमुळे वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट होऊ लागला आहे. जिल्ह्यात रात्रीच्या वेळी शिकारीचे प्रमाणही वाढले असून छुप्या रीतीने शिकार करण्यासाठी फासकीचा अवलंब केला जात आहे. तंटामुक्त समित्यांच्या माध्यमातून या फासकीतंत्रावर अंकुश आणण्यासाठी जिल्हा पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र त्याला यश आलेले नाही.
जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढत असताना बिबटे मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत. सन 2010 पासूनची आकडेवारी पाहिल्यास आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 37 बिबट्यांना प्राण गमावावा लागला आहे. यात फासकीत अडकणा-या बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्यात विविध भागात 23 ठिकाणी बिबटे फासकीत अडक ले त्यात गुरफटून 8 बिबट्यांचा मृत्यू झाला तर जखां झालेल्या 15 बिबट्यांवर औषधोपचार करून त्यांना सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले.
आत्तापर्यंत 17 ठिकाणी बिबटे विहिरीत पडण्याच्या घटना घडल्या. त्यात 4 बिबट्यांना जीव गमवावा लागला तर 13 बिबटे सुखरूप बाहेर काढण्यात आले. जिल्हाभरात गेल्या 7 वर्षात नैसर्गिकरित्या 16 बिबट्यांचा मृत्यू झाला तर रस्ता - रेल्वे अपघातात 7 बिबट्यांना जीव गमावावा लागला. जिल्हाभरात आत्तापर्यंत शिकारीत 3 बिबटे मारले गेल्याचीही नोंद आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 26 वनरक्षक तर 10 वनपाल आणि 3 वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. या सर्वांमार्फत बिबटे आढळल्याचे समजताच तत्काळ त्यांना सुखरूप सोडविण्याची कार्यवाही केली जाते. वन विभाग बिबट्यांना वाचविण्यात प्रयत्नशील आहे.