Breaking News

जानेवारीत ‘नाशिक पेलेटॉन - 2018’ चे आयोजन

नाशिक, दि. 24, नोव्हेंबर - नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने ‘नाशिक पेलेटॉन 2018’ ही राष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा 6 व 7 जानेवारी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 6 वर्षापासून शहरात सायकलचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन प्रयत्न करत असताना 2014 साली पहिल्यांदा पेलेटॉनचे आयोजन करण्यात आले होते. 


स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून संपूर्ण भारतातून स्पर्धक सहभागी होत असतात. यावर्षीही नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधांचा खुबीने वापर करून घेण्यात येणार असून स्पर्धक नाशिक सायकलिस्ट्सच्या संकेतस्थळावरही नोंदणी करू शकणार आहेत.

रस्त्यावरील सायकल स्पर्धा (जपठेरव उूलश्रळपस ठरलश) हा लोकप्रिय क्रीडा प्रकार असून नाशिक पेलेटॉन ही स्पर्धा देखील हा खेळ लोकप्रिय करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. दीर्घ पल्ल्याची (150 किमी) नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या अवघड घाटवळणांवरून नाशिक पेलेटॉनचे स्पर्धक मार्गक्रमण करतील.

150 किमीची पेलेटॉन स्पर्धा 18 ते 40 वर्षातील महिला व पुरुष गट तसेच 40 वर्षावरील गटासाठी नाशिक - कसारा - घोटी - कावनई - त्र्यंबकेश्‍वर - नाशिक अशा मार्गावर होईल. तर 50 किमीची मिनी पेलेटॉन स्पर्धा नाशिक - त्र्यंबकेश्‍वर - नाशिक अशा मार्गावर होणार आहे.

यावर्षी पेलेटॉन 2018 मध्ये 150 किमी पेलेटॉन स्पर्धेसाठी इलाईटअसा विशेष गट तयार करण्यात आला असून सायकलिंग क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्न विविध स्पर्धांत सहभाग घेतलेल्या व्यावसायिक सायकलिस्ट्ससाठी स्पर्धा संपवण्याची वेळ व इतर वेगळे नियम करून त्यांना देण्यात येणार्‍या बक्षिसांमध्येही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

तसेच 14 ते 18 वयोगटातील मुलांकरिता 15 किमीची विशेष पेलेटॉन आणि हौशी सायकलिस्ट्ससाठी (सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी) 5 किमीची ‘जॉय राईड’ देखील आयो जित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना दरवर्षीप्रमाणे मोठी बक्षिसे देण्यात येणार असून एकूण बक्षिसांची रक्कम 10 लाखापर्यंत आहे. घाटाचे अंतर कमीत कमी वेळात सर्वप्रथम पार करणार्‍या स्पर्धकाला ‘घाटाचा राजा’ हा मानाचा किताबही दिला जाणार आहे.


गेल्या 6 वर्षापासून सायकलचा वापर वाढवा म्हणून नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशन प्रयत्न करत आहेत. सायकलिंग विषयी माहिती व्हावी, सायकल्सचा वापर वाढवा जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सातत्याने इंडियन सायकल मुंबई रॅली, पंढरपूर सायकल वारी, एनआरएम सायकलिंग, लहान मुलांसाठी दर महिन्यात एक राईड अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिक मधील चळवळ पुढे नेण्याचा नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचा प्रयत्न आहे. सायकलचा जास्तीत जास्त वापर वाढवावा, शहरे प्रदूषणमुक्त व्हावीत हा देखील या चळवळीमागील प्रमुख उद्देश आहे.