डिंगणी-जयगड रेल्वेमार्गाविरोधात 2 डिसेंबरला आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी, दि. 24, नोव्हेंबर - नियोजित डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाविरोधात संगमेश्वर तालुक्यातील 9 गावांच्या संघर्ष समितीने 2 डिसेंबर रोजी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.सुमारे 35 किमी लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी कोकण रेल्वे, कोकण मेरीटाइम बोर्ड आणि जिंदाल कंपनी यांची संयुक्त भागीदारी आहे.
यासाठीचे सर्वेक्षणही सुरू झाले असून काही भागात मार्गाचे काम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. स्थानिकांच्या समस्या सोडविण्याआधीच प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने संगमेश्वर तालुक्यातील ज्या 9 गावांमधून हा मार्ग जाणार आहे अशा सर्व गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन संघर्ष कृती समितीची स्थापना केली आहे. यासाठी गेल्या 2 महिन्यात 6 बैठका घेऊन स्थानिकांसह बाधित होणा-या ग्रामस्थांची मते आजमावून घेण्यात आली.
या बैठकांमधून या मार्गामुळे होणारे नुकसान कसे टाळणार आणि स्थानिकांचे प्रश्न कसे सोडविणार हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत या मार्गाला विरोध करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. उपळे, डावखोल, मांजरे, फुणगूस, डिंगणी, देण, परचुरी अशा 9 गावांमधील ग्रामस्थ या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. याआधी या समितीने 20 नोव्हेंबर रोजी प्रकल्पविरोधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
तसे पत्र 7 नोव्हेंबर रोजी सादर करण्यात आले होते. मात्र 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या काळात जिल्ह्यात मनाई आदेश असल्याने या कालावधीत आंदोलन करता येणार नसल्याचे प्रशासनाने समितीला कळविले होते. यानुसार हे आंदोलन स्थगित करू न ते आता 2 डिसेंबरला करण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे.