कोहलीची तुलना सचिन तेंडुलकरशी नको - गांगुली
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद झुंजार शतक ठोक णाऱ्या विराट कोहलीने कसोटीतील अठरावे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शतकांचे अर्धशतक साजरे केले. मास्टर ब्लास्टरने आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत शतकांचे शतक झळकावण्याचा महापराक्रम केला.
कोहलीने तरुण वयातच या विक्रमाला गवसणी घातल्याने टीम इंडियाचा कर्णधार कोहली सचिन तेंडुलकरचा महाविक्रम मोडीत काढू शकेल, अशी चर्चा सुरू झाली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मात्र कोहलीची सचिनशी केलेली तुलना मान्य नाही.
पहिल्या कसोटीनंतर पत्रकारांशी बोलताना बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षाने सांगितले, विराटची सचिनशी आताच तुलना करणे घाईगर्दी होईल. त्याला आणखी ५० शतके ठोकावी लागतील, पण ज्या तऱ्हेने त्याने ईडन गार्डनवर सोमवारी फलंदाजी केली त्यावरून तो आणखी काही शतके नक्कीच झळकावू शकेल, यात शंका नाही.
