Breaking News

पुढील वर्षी जगाला अधिक संख्येने शक्तिशाली भूकंपाचा सामना करावा लागेल.


वॉशिंग्टन : पुढील वर्षी जगाला अधिक संख्येने शक्तिशाली भूकंपाचा सामना करावा लागेल. इतकेच नाही तर आगामी काही वर्षे हीच धोकादायक स्थिती कायम असेल, असा गंभीर इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. पृथ्वी परिवलनाची नियतकालिक गती कमी झाल्याने ही स्थिती उद्भवणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
कोलोराडो विद्यापीठातील रॉजर बिल्हॅम आणि मोन्टाना विद्यापीठातील रेबेका बेंडिक यांनी यासंबंधीचे महत्वाचे संशोधन केले आहे. अमेरिकन भूगर्भशास्त्रविषयक सोसायटीच्या वार्षिक परिषदेत आपला शोध निबंध सादर करताना या संशोधकांनी पुढच्या वर्षी जगाला भूकंपाचा धोका अधिक असल्याचे म्हटले आहे. 


जागतिक पातळीवर होणाऱ्या भूकंपाच्या घटना आणि पृथ्वी परिवलनाच्या गतीमध्ये स्पष्टपणे सहसंबंध आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. भूकंपाच्या धक्क्यांचा सर्वाधिक धोका प्रचंड लोकसंख्या असलेल्या उष्णकटिबंधीय देशांना असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. 

पृथ्वी परिवलनाच्या गतीमधील चढउत्तार हा अतिशय लहान आहे. यामुळे दिवसाच्या कालावधीत काही मिलीसेकंदाचा फरक पडतो. मात्र, हा वेळ मोठया प्रमाणात भूमिगत उर्जा निर्माण करण्यास पुरेसा आहे, असे या संशोधकांनी सांगितले. मागील शतकात मोजक्या पाच वेळेस २५-३० टक्क्यांनी भूकंपाच्या वार्षिक संख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाची तीव्रता ७.० किंवा त्यापेक्षा अधिक होती.