Breaking News

पर्यावरणासाठी प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वी करा - रामदास कदम

औरंगाबाद, दि. 24, नोव्हेंबर - महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृतीव्दारे सामाजिक मानसिकता तयार करुन शासकीय यंत्रणा आणि जनसहभागाच्या एकत्रित प्रयत्नातून प्लास्टिक बंदीची मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी येथे केले.


जिल्हाधिकारी कार्यालयात प्लास्टिक बंदी धोरणांच्या व संभाव्य कायद्याच्या संदर्भात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी त्यांनी अधिकार्यायांना निर्देश दिले. पर्यावरण आणि सर्व सजीवांच्या आरोग्याला प्लास्टिकचा वाढता उपयोग आणि त्याची योग्य विल्हेवाट न लावण्याचे प्रमाण हे घातक ठरत असल्याने प्लास्टिकच्या वापरावर पुर्णपणे निर्बंध आणून पर्यावरण आणि आरोग्य दोन्हीच्या संवर्धनासाठी राज्य शासन पाडव्याला प्लास्टिक बंदीचा कायदा करणार आहे.

असे सांगून पर्यावरण मंत्री रामदास कदम पुढे म्हणाले की, कायदयाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी येत्या महिन्याभरात सर्व शासकीय कार्यालय ,विभागीय आयुक्तालयापासून ग्राम पंचायत आणि शाळापासून महाविद्यालय, विद्यापीठ या सर्व ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या या गोष्टींचा वापर बंद करावयाचा आहे. 

कापडी पिशवी हा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद करण्यासाठी उत्तम पर्याय असून जिल्हाधिकारी यांनी सीएसआरच्या माध्यमातून तसेच नाविन्यपुर्ण योजना निधी मार्फत आवश्यक तो निधी उभारुन महिला बचत गटांना कापडी पिशव्या तयार करण्याचे काम दयावे. 

जिल्हा परिषदेमार्फत वितरित करण्यात आलेल्या शिलाई मशीनच्या लाभार्थ्यांना कापडी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण व काम देऊन मोठ्या संख्येने कापडी पिशव्या उपलब्ध करुन द्याव्यात. कापडी पिशवीच्या वाढत्या वापरामुळे शेतक-यांच्या कापसाला चांगला भाव मिळण्यास तसेच महिला बचत गटांना मोठया प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास सहाय्य होईल, असे कदम यावेळी म्हणाले.

कापडी पिशवीचा वापर आणि प्लास्टिकच्या पर्यायी साधनांचा वापराचे प्रमाण वाढवण्यासाठी शाळा, माहाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणाधिकारी यांचे प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत. जिल्हा परिषद , नगरपालिका यंत्रणेच्या अधिकार्यांनी नगरसेवक, सरपंच ,स्थानिक लोकप्रतिनिधीं यांना सोबत घेत गावापासून शहरापर्यंत सर्व ठिकाणी प्रभावीपणे कृती कार्यक्रम आखून प्लास्टिकच्या वापराला प्रतिबंध करावा. 

जनतेला प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करत असताना कचरा व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून त्यावर योग्य ती पूर्नवापराची प्रक्रिया करुन ते पाणी शेतीसाठी उपलब्ध करुन द्यावे. कोणत्याही ठिकाणी सांडपाणी हे नद्या, उपयुक्त पाणी साठयात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश रामदास कदम यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त डॉ.भापकर यांनी मराठवाडा विभागात प्लास्टिक बंदीची मोहीम सर्व यंत्रणा समन्वयपूर्वक उत्तक काम करुन शंभर टक्के यशस्वी करतील असे सांगितले. बैठकीस विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हा परिषदा, नगरपालिका, जिल्हा प्रशासन, कृषी,सार्वजनिक बांधकाम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.