Breaking News

कार्यकारी अभियंता वाळकेंच्या भ्रष्टाचाराचा हिवाळी अधिवेशनात फैसला !

साबां मंत्र्यांच्या प्रतिष्ठेला आव्हान ; सात डिसेंबरच्या अहवालाची प्रतिक्षा 


मुंबई/विशेष प्रतिनिधी ;- पेटलेला वणवा कपड्याने झाकून विझवता येत नाही. त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा वणवाही चौकशी अहवालाशी प्रतारणा करून भ्रष्टाचार्‍यांच्या पाठीशी उभे असलेल्या मंत्र्यांच्या भरवशावर दाबता येणार नसल्याचे संकेत आहेत,या भ्रष्ट अभियंत्यांना 7 डिसेंबर नंतर भ्रष्टाचाराच्या पापाचे प्रायश्‍चित भोगावे लागणार असून हिवाळी अधिवेशनात हाच मुद्दा सरकारच्या पारदर्शक कारभाराचे वाभाडे काढण्यास निमित्त ठरेल. असा जाणकारांचा होरा आहे. 

मुंबई साबां प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहर इलाखा विभागातील मनोरा आमदार निवास इमारतीचा पाच कोटींचा अपहार येत्या काही दिवसात साबांसाठी डोकेदुखी ठरणार असून राज्य शासन विशेषतः साबां मंत्र्यालयाच्या कारभाराची नाचक्की करणार असल्याचे संकेत राजकीय आणि साबां वर्तूळातून मिळत आहेत. मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामात हेराफेरी करून शहर इलाखा शाखेच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांनी सह अभियंत्यांशी संगनमत करून कामे न करताच बोगस नोंदींच्या आधारे तब्बल पाच कोटीच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप आ.चरणभाऊ वाघमारे यांनी केला होता. 

या आरोपीच्या चौकशीला न्याय देण्यास साबां प्रशासनाने टाळाटाळ तर केलीच पण साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही अपहार प्रकरणी दोषी आढळलेल्या कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांना पाठीशी घालून चौकशी अहवाल गुंडाळला. 

आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंञ्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे प्रधान सचिवांनी हे प्रकरण फ्लाईंग स्क्वाडकडे चौकशीसाठी दिले असून अधिक्षक अभियंता चामलवार या प्रकरणातील एकवीस आमदार कक्षांची चौकशी करीत आहेत, या आधी अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी दहा आमदार कक्षांची चौकशी करून अपहार झाला आणि या अपहाराला तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके आणि त्यांचे सहकारी सहअभियंता हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. 

त्या अहवालाच्या आधारे दोन सहअभियंत्यांना निलंबित करण्यात आले. तथापी या कटकारस्थानाच्या सुत्रधाराला साबां मंत्र्यांनी अभय दिल्याने नैसर्गीक झाला नाही अशी भावना साबांत व्यक्त केली जात आहे. दरम्यान फ्लाईंग स्क्वाड चौकशी करीत असलेल्या त्या 21 कक्षांमध्ये झालेल्या घोळाचा अहवाल 7 डिसेंबर पर्यंत प्राप्त होणार असून त्यानंतर अधिक काळ साबां मंत्री भ्रष्ट कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांना वाचवू शकणार नाहीत अशी अपेक्षा साबांतून व्यक्त केली जात आहे. 

त्याच काळात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशन काही सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षांचे आमदार शहर इलाखा शाखेतील या प्रकरणावर लक्षवेधी,स्थगन प्रस्ताव,विशेष हक्कभंग अशा संवैधानिक आयुधांचा वापर करून साबां मंत्र्यांना कोंडीत पकडणार असल्याचेही वृत्त आहे. सरकारची प्रतिष्ठा जपण्यासाठी या भ्रष्ट अभियंत्यांवर कारवाई करावी लागेल असा जाणकारांचा होरा आहे. 

तर न्यायालयाला साकडे 
साबां मंत्र्यांचा पाठींबा मिळाल्याने भ्रष्ट कार्यकारी अभियंता लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत. प्रसार माध्यमांनाही झुगारून लावीत आहेत, या पार्श्‍वभुमीवर हा मुद्दा लोकप्रतिनिधी आणि माध्यमांसाठी प्रतिष्ठेचा बनला असून शासन पातळीवर कारवाई झाली नाही तर न्याय मिळविण्यासाठी न्यायव्यवस्थेला साकडे घातले जाईल, या लढाईतही लोकमंथन वृत्तसमुह अग्रभागी असेल.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा