Breaking News

पोटनिवडणूकीच्या पाठिंब्यासाठी चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’वर

 मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीत उमेदवारच्या पाठिंब्यासाठी भाजपने थेट ‘मातोश्री’ला साकडे घातले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात गुरूवारी मातोश्रीवरील बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि माझा जुना परिचय असल्याने बराच वेळ चर्चा झाली. मात्र बैठकीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. 


विधानपरिषद पोटनिवडणुकीत नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम असल्याने भाजपने आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु नारायण राणेंबाबत चर्चा करण्याइतपत मी मोठा नेता नाही, त्याबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं पाटील म्हणाले. 

पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण याच जागेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत. 

नारायण राणेंच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे, हे उघड आहे. भाजपने उमेदवार दिला, तरी शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय उमेदवार जिंकून येणं कठीण आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल फोनवरुन चर्चाही झाली. मात्र शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यानंतर गुरूवारी मातोश्रीवरील भेटीत चंद्रकांत पाटील यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली. 

नेमून दिलेली कामं करतो
मातोश्रीवरील भेटीत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा खड्ड्यांचा दौर्‍याबाबत माहिती दिल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. मी फक्त मला दिलेले काम पार पाडतो, इतर कामात ढवळाढवळ करत नाही. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दोघेही पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौरावर असल्याने एकाच विमानात जा, अशी विनंती त्यांना केली. मात्र वेळ वेगळी असल्याने ते शक्य नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. उद्धवजींचं कोल्हापुरातच काय अवघ्या महाराष्ट्रात नेहमीच स्वागत करु, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा