आयपीएल खेळाडूंचा लिलाव होणार भारतातच.
नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव इंग्लंडमध्ये व्हावा, अशी मागणी दोन संघांनी केली असली तरी आधीच्या प्रथेप्रमाणेच हा लिलाव भारतातच होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलमधील संघांचे मालक आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस दिल्ली डेअरडेव्हिल्सचे जी. एम. राव, मुंबई इंडियन्सचे आकाश अंबानी, कोलकाता नाईट रायडर्सचे मालक शाहरूख खान आणि जय मेहता, किंग्ज इलेव्हन पंजाबचे मोहित बर्मन आणि नेस वाडिया हे उपस्थित होते.
निलंबनाच्या कारवाईनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व मनोज बेदाले तर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व जॉन जॉर्ज यांनी केले. काही खेळाडू स्वत:कडेच ठेवण्याची तसेच राईट टू मॅच (स्वत:च्या संघातील खेळाडू लिलावात उतरला आणि त्याला दुसऱ्या संघाने खरेदी केले तर त्या खेळाडूला पुन्हा खरेदी करण्यासाठी मूळ संघाकडे विचारणा केली जाते.) या पद्धतीला राजस्थान रॉयल्सने विरोध दर्शवला. किंग्ज इलेव्हन पंजाबने मात्र आधीच्या संघातील दोन खेळाडू स्वत:कडे ठेवण्यात यावेत अशी मागणी केली.