Breaking News

संपादकीय देशात खळबळ....पण का?

देशाची सत्ताकेंद्रे पादाक्रांत केल्यानंतर आपला अजेंडा राबविणे सत्ताधारी पक्षाची स्वाभाविक कार्यपध्दती असते. विद्यमान सताधारी यापेक्षा वेगळे काही करीत आहेत असे नाही तरीदेखील अवघ्या देशात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.या मातीच्या संस्कृतीला मोठा धोका आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे. हे प्रथमच घडत आहे असेही नाही. 

देश स्वतंत्र झाल्यापासून किंबहूना त्याआधी अशा प्रकारचे वातावरण अधूनमधून निर्माण केले जात असल्याचा इतिहास आहे. स्वातंञ्य पुर्व काळात जहाल मवाळ अशा दोन गटात सुरू असलेल्या संघर्षातून तर स्वातंञ्यानंतर प्रतिगामी- पुरोगामी, धर्मवादी -धर्मनिरपेक्ष गटात होणारी सत्ता स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष जेंव्हा जेंव्हा ऐरणीवर येतो तेंव्हा तेंव्हा अशी खळबळ माजविणारे वातावरण या देशाने अनेकदा अनुभवले आहे. तरीही आज या देशात अबोल भीतीचे सावट पसरल्याचा भास निर्माण होण्याचे कारण जाणकारांसाठी अभ्यासाचा विषय आहे.

बर्याच वर्षानंतर किंबहूना पहिल्यांदाच एक विशिष्ट विचारधारा देशपातळीवरील सत्तेच्या केंद्रस्थानी आली आहे.उजव्या पण मवाळ विचारधारेने तयार झालेल्या राजकीय भुमीवर क डवटजहाल विचारधारेने ताबा मिळवल्याने कदाचित वातावरणात असमतोल निर्माण झाला असावा असा एक मतप्रवाह आहे.

अचानक आलेली वादळं सोसणे अवघड जाते. त्यातलाच हा प्रकार आहे, असे या मंडळींचे मत आहे. काही अंशी हा मत प्रवाह तार्कीक असला तरी वास्तव माञ वेगळे आहे असे वाटणारा जाणकारांचा एक गट आहे.या दोघांमधील वाद - प्रतीवाद वर्तमान खळबळीचे खरे कारण मानता येईल.

धर्मनिरपेक्ष आणि हिंदूत्ववादी विचारसरणीतील सरळ सरळ संघर्ष वर्तमानातील खळबळीला कारणीभूत आहे असे थेट म्हणता येईल.स्पष्टच सांगायचे झाले तर आजच्या सत्ताधार्यांना आजवर सांगीतला गेलेला धर्मनिरपेक्षवाद मान्य नाही. 

धर्मनिरपेक्षवाद कुणा एकाचा अनुनय करीत नाही.धर्मनिरपेक्षवाद्यांनी या देशाचा मुळ धर्म जो त्यांना अभिप्रेत आहे त्या हिंदू धर्माला हिनवण्याची, दुय्यम वागणूक दिल्याचा कट्टर हिंदूत्ववाद्यांचा आक्षेप आहे. स्वतंञ भारतावर गेली 64 वर्ष सत्ता राबवलेल्या काँग्रेस विचारसरणीने या देशात मिथ्या धर्म निरपेक्षवाद जोपासला, डाव्या विचारसरणीने त्यात भर घातली. असा आक्षेप सातत्याने नोंदविणारे कट्टर हिंदूत्ववादी सत्तेवर आल्यानंतर धर्मनिरपेक्षवादावर शस्रक्रिया करून मुळ प्रवाहात आणण्याची धडपड सुरू झाली असा हिंदूत्ववाद्यांचा दावा आहे.

आजच्या परिस्थितीत या दोन्ही विचारसरणी आखाड्यात उतरून समोरासमोर एकमेकांना काऊंटर करू लागल्याने होणार्या संघर्षाने उडणार्या ठिणग्या समाजव्यवस्थेत अशांततेचा वणवा पेटवित आहे. कट्टर हिंदूत्ववाद्यांचे प्रतिनिधी म्हणून माजी केंद्रीय मंञी आणि भाजपाचे खा. डा. सुब्रमण्यम स्वामी तर धर्मनिरपेक्षवादी विचारसरणीचे प्रतिनिधीत्व कन्हैय्याकुमार यांच्यासारखी मंडळी करीत असून दोन्ही बाजूने आपला अजेंडा देशाच्या गळी उतरविण्याची तिव्र स्पर्धा आहे.

दोन्ही बाजूने इतिहासाचे पोस्टमार्टम करून भूतकाळाच्या पोटात दडलेले रहस्य देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.यातले नेमके सत्य काय? याचे उत्तर सामान्य समाजाला समजत नसल्याने संभ्रमतेची लहर निर्माण होऊन भीतीदायक वातावरण तयार झाले आहे.यातून देशाला सहजपणे बाहेर काढण्यासाठी सत्तेचा मोह नसलेल्या निर्विवाद निर्मोही विचारसरणीची गरज आहे.