Breaking News

मी लाभार्थी’ या जाहिरातीत वापरण्यात आलेली सर्व माहिती ही खरी - मुख्यमंत्री

पुणे, दि. 13, नोव्हेंबर - शेतकरी हाच देशाचा कणा आहे, शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. अडचणीतल्या शेतकर्‍यांबरोबरच प्रामाणिक शेतकर्‍यांनाही सरकार मदत करणार असून शेतकरी हाच खरा हिरो असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 



मधुकरनगर-पाटस ता. दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा 37 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले, शेतकर्‍याला उभे करण्याची ताकत सहकारी साखर कारखान्यात आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखाने वाचले पाहिजेत, साखर उद्योग वाढला पाहिजे. 

यासाठी शासन कायमच साखर उद्योगाच्या मागे ठामपणे उभे आहे. साखर उद्योगाला स्थिरता आणण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राज्यातील 99.5 टक्के कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकर्‍यांच्या उसाला दर दिला आहे. शेतकर्‍यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. त्यामुळेच राज्याच्या शेती विकासाचा दर साडेबारा टक्के झाला आहे.

शेतकर्‍यांच्या सिंचनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबिवले. या माध्यमातून गेल्या तीन वर्षात राज्यात 21 लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवनमानात मोठा बदल झाला. अडचणीतील शेतकर्‍याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे शासनाने ऐतिहासिक कर्ज माफी केली आहे. मात्र याच बरोबर शेतीमधील गुंतवणूक वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. गेल्या काही वर्षात अर्धवट अवस्थेतील राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. येत्या दोन वर्षात हे अर्धवट असणारे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत.

राज्याच्या सकल उत्पन्नात भर टाकणारा शेतकरी हाच सरकारचा ख्ररा हिरो आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने राबविण्यात येणार्‍या जाहिरातीत खर्‍या लाभार्थी शेतकर्‍यांचे मोठे फोटो वापरण्यात आले आहेत. ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत वापरण्यात आलेली सर्व माहिती ही खरी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. यावेळी भीमा कारखान्याला विशेष मदत करुन कारखाना पुन्हा सुरू केल्या बद्दल कारखान्याच्या 50 हजार सभासदांच्यावतीने कारखान्याचे जेष्ठ सभासद, जेष्ठ कामगार व कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार केला.