Breaking News

सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याची गरज - डॉ. मोहन भागवत

पुणे, दि. 13, नोव्हेंबर - संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढतो आहे. या प्रभावातून परिवर्तन दिसते आहे. या सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.



संघ विचाराने प्रेरित होऊन काम करणार्‍या महाराष्ट्रातील विविध संस्था व संघटनांच्या कामांचा आढावा, संघटनात्मक वाढ, सेवा कार्यांची स्थिती, पुढील संकल्प याविषयी चर्चेसाठी आयोजित समन्वय बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. रविवारी (ता. 12 नोव्हेंबर) मयूर कॉलनी, कोथरूडमधील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. भागवत म्हणाले की, संघाकडून समाजाची अपेक्षा वाढते आहे. वाढलेल्या अपेक्षांमुळे राष्ट्रीय विचारांच्या सर्व संघटनांची जबाबदारीही वाढली आहे. आपल्या कुटुंबात व समाजामध्ये कुटुंबप्रबोधनाद्वारे मूलभूत राष्ट्र भावना वाढीस लागेल असे संस्कार व्हावेत अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. या बैठकीत महाराष्ट्रातील संस्था व संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रतिवर्षी व विविध शहरांमध्ये होणारी ही बैठक यंदा पुण्यात आयोजित करण्यात आली होती.

समाजात विशेषतः तरूण वर्गात रा. स्व. संघाची वाढती स्वीकारार्हता, संघकामाचा गावपातळीपर्यंतचा विस्तार, संघ विस्ताराचा व सेवाकार्यांचा आढावा, विविध कामे व सेवाकार्यात समर्पित भावनेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांची वाढती संख्या, लक्षणीय संख्येने होत असलेली कामे व सेवाकार्यातून समाजातील अंत्योदयाच्या कल्याणाचा विचार करताना सामना करावा लागत असलेली आव्हाने, त्यावरील उपाय तसेच पुढील वाटचालीतील संकल्प या व अशा अनेकविध पैलूंवर बैठकीत विस्ताराने चर्चा करण्यात आली.