Breaking News

जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगले पाहिजे- प्रवीण गायकवाड

पुणे, दि. 22, ऑक्टोबर - ‘बहुजनांना जागे करणे आजही गरजेचे आहे. बहुजनांनी लिहिले - वाचले पाहिजे. आपण सगळ्यांनीच जाती धर्माच्या पलीकडे  जाऊन माणूस म्हणून जगले पाहिजे. अशा प्रबोधन दिवाळी पहाटमधून माणुसकीकडे आपण नक्कीच जाऊ शकतो.’ असा विश्‍वास शेतकरी कामगार पक्षाचे  नेते व संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शिवस्पर्श विशेषांकाचे प्रकाशन करताना व्यक्त केला. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे मनपाचे सह आयुक्त व शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर मोळक यांनी केले. ते म्हणाले, ‘आपली खरी संस्कृती कृषी  संस्कृती असून सम्राट बळीराजाचे आपण वंशज आहोत म्हणून बळीराजाचे पूजन व समाज प्रबोधन होण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून ही प्रबोधन दिवाळी  पहाट सुरु आहे. विद्रोह करणे कधी कधी गरजेचे असते म्हणूनच आज विद्रोही जागर करत आहोत.’ बलिप्रतिपदेनिमित्ताने आपण घरोघरी बळीराजा पूजन  साजरे करून कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन मोळक यांनी केले. या प्रसंगी विचारपीठावर राजाभाऊ चोपदार, अंकुश आसबे, नरेश शेट्टी, वैभव शेळके  व शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अ‍ॅड. शैलजा मोळक उपस्थित होते.
शाहिर राजेंद्र कांबळे यांनी ‘विद्रोही जागर’ या कार्यक्रमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. वाचन, शिक्षण, मुलगा मुलगी समानता, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा व  बुवाबाजी, भ्रष्टाचार, शेतकर्‍यांच्या व्यथा, स्त्रीवरील अन्याय अत्याचार, हुंडा प्रथा इत्यादी सामाजिक विषयांना स्पर्श करत शाहिर कांबळे यांनी अडीच तास  रसिकांना खिळवून ठेवले. बुद्ध, सम्राट बळीराजा, जिजाऊ, छ.शिवाजी महाराज, छ.शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, सत्यशोधक महात्मा फुले,  क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले, शाहिर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब अंबेडकर या महामानवांच्या खर्‍या इतिहासाची साक्ष देऊन अंगावर शहारे निर्माण  करत शाहिरीतून हे सगळे आपले खरे पूर्वज आहेत असे सांगितले. त्या महामानवांची अजांतेपणे क्रुर चेष्टा अनेक दशक आपण करत आलो. पण आता नाही!  वेळ आली आहे आपल्या बुद्धिवर पाडलेला पडदा फाडून टाकण्याची. असे सांगत नक्कीच विचारांचा जागर करण्यात आला. बलिप्रतिपदेदिवशी एक तिखट  पण वैचारिक दिवाळी पहाट सगळ्यांनी अनुभवली.
दिवाळी साजरी करत असताना कृतज्ञता म्हणून कर्णबधीर असणार्‍या संपत जागडे याला ‘चळवळीतील अवलिया’ या विशेष सत्काराने व रक्कम रुपये  11,000/- चा धनादेश देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात सम्राट बळीराजाचे पूजन आणि शिवस्पर्श गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार प्रतिष्ठानचे सचिव प्रज्ञेश मोळक यांनी केले.