Breaking News

तणनाशक निरोधक बी. टी. बियाणांच्या विक्रीची सीबीआय चौकशी करा - किशोर तिवारी

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक , मध्य प्रदेश आदी राज्यांत तणनाशक निरोधक बी टी  बियाणाची 35 लाख पाकिटे अवैधरीत्या विकले गेल्याप्रकरणी संबंधितांना कठोर शिक्षा करा व याण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा’, अशी मागणी  वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे .
दिल्ली येथील साउथ आशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरच्या अहवालात तणनाशक निरोधक बी टी बियाणाची 35 लाख पाकिटे अवैधरीत्या विकली गेल्याचे सिद्ध  झाले आहे . यात मोन्सँटो कंपनीचे तणनाशक निरोधक(राऊंडउपबीटी) तंत्रज्ञानाचा अवैध वापर करून सुमारे 40 लाख पाकीटे बियाणे बनवली गेली . या  बियाणांचा वापर करून सुमारे साडेआठलाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असे अतिशय धक्कादायक सत्य समोर आल्याचे तिवारी यांनी पत्रकात नमूद केले  आहे .
तणनाशक निरोधक कापसाच्या बियाण्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आल्यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या बियाण्यावर बंदीची मागणी केली होती .  आता किशोर तिवारी यांनीही हा मुद्दा थेट केंद्रीय गृहमंत्रालयापर्यंत नेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आहे . केंद्राची जेनेटिक इंजिनीअरिंग अप्रेजल  कमिटी , केंद्र सरकारचिंच कृषी संशोधन परिषद व कापूस संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठाची अवैध बियाणे रोखण्याची जबाबदारी आहे.अशा  बियाण्यांना परवानगी देण्यासाठी कायदे, नियम आहेत. केंद्रीय कापूस अनुसंधान परिषद, कृषी परिषदे सह विविध संस्थांचे अशा बियाण्यांवर नियंत्रण असते.  त्यांच्या मान्यतेविना असे बियाणे देशात येत नाहीत. अशा स्थितीत हे बियाणे आलेच कसे, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला आहे. अख्ख्या देशात  हा गोरखधंदा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांच्या हात मिळवणीमुळेच चालत असावा , असा आरोपही तिवारी यांनी केला आहे .गेल्या 2-3  वर्षांपासून तणनाशक निरोधक राऊंड उप बी टी बियाण्यांचा वापर वाढला आहे कारण याला शेतकर्‍यांची गावस्तरावर मागणी आहे तसेच तणनाश  करण्यासाठी लागणारी भरमसाट मजुरी कारणीभुत आहे मात्र त्याचा परिणाम शेतकर्‍यांचे आरोग्य आणि जमिनीवर होत आहे. पेरणी झालेल्या परिसरात  कॅन्सर, किडनीचे आजार होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद केले गेले आहे. पांढर्‍या थैलीत आणून त्याची सर्रास विक्री होते  आणि गावोगावी पेरणी केली जात असताना देखील कृषी विभागाला याची माहिती होत नाही, हे आश्‍चर्य आहे, असेही तिवारी यांनी पत्रकात म्हटले आहे .