Breaking News

शाश्‍वत शेती, परवडणार्‍या घरांसह कौशल्य विकासाला गती मिळणार

मुंबई, दि. 13, ऑक्टोबर - राज्य सरकारकडून शाश्‍वत शेती, परवडणारी घरे आणि कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना स्वीडनमधील विविध आघाडीच्या उद्योगसमुहांचे  सहकार्य लाभणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज स्टॉकहोम येथे याबाबतच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
स्वीडनच्या दौर्‍यावर असलेल्या महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने कालपासून विविध उद्योगसमुहांशी संपर्क साधून मेक इन महाराष्ट्र अभियानाला जोरदार गती दिली आहे. मुख्यमंत्री  फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मलिक आदींनी यासाठी केलेल्या चर्चा फलदायी ठरत असून विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
स्वयंचलित हवामान केंद्रांच्या उभारणीस गती
स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया एक्स्पोमधील इरिक्सन स्टुडियोत विविध क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या अविष्कारांचा मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला.  यावेळी त्यांनी बोलणारे झाड आणि नव्या 5-जी मोबाईलसाठी वापरण्यात येणार्‍या तंत्रज्ञानाबरोबरच इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. हवामान अनुकूल  शेतीसाठी महाराष्ट्रात 2065 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत. ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी इरिक्सनने सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी या  उद्योगसमुहास केली. त्यानुसार हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी उत्सुक असल्याचे इरिक्सनकडून सांगण्यात आले. त्यानुसार  इरिक्सन इंडिया आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात एका सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे इरिक्सनच्या उत्पादनांची पुण्यातून निर्यात करणे आता शक्य  होणार आहे.
नाविन्यपूर्ण आणि परवडणार्‍या घरांसाठी इकोस्टोनसोबत करार
नाविन्यपूर्ण आणि परवडणार्‍या घरांच्या क्षेत्रात काम करणार्‍या इकोस्टोन उद्योगाचे संस्थापक आणि व्यवसाय विकास विभागाचे अध्यक्ष अँडर्स लिंडक्वेस्ट यांनी मुख्यमंत्र्यांची भेट  घेतली. जलदगतीने तयार होणार्‍या घरांच्या निर्मितीत हा उद्योग अग्रेसर आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांमुळे तात्पुरत्या स्वरुपात इतरत्र राहायला जाव्या  लागणार्‍या प्रकल्पग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात अशा घरांची आवश्यकता आहे. त्यामुळे विविध कारणांनी तात्पुरता आश्रय घ्याव्या लागणार्‍यांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये या  उद्योगाने योगदान देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी लिंडक्वेस्ट यांना केली. यासंदर्भात ट्रिनिटी समूह आणि इकोस्टोन यांच्यात सामंजस्य करारावर देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्या  करण्यात आल्या.