Breaking News

दिवाळीतही कांदा लिलाव राहणार सुरू

नाशिक, दि. 13, ऑक्टोबर - कांदा भाववाढीचा मुद्दा केंद्राने गांभीर्याने घेतल्याने आता कांदा दर नियंत्रणासाठी दिवाळी सुटीच्या काळातही कांदा लिलाव सुरू ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. त्यामुळे आता बाजार समित्यांना एकाच वेळी बंद ठेवता येणार नाही. सुटीच्या काळातील दररोजच्या कांदा साठ्याची माहिती  प्रशासनाला देण्याचे आदेशही देण्यात आले.
गेल्या महिन्यात शेजारच्या राज्यातील कांद्याचे उत्पादन घटल्याने राज्यातील कांद्याचे भाव जवळपास तीन पटीने वाढले. अगोदरच महागाईने जनता त्रस्त झाली असताना कांद्याचे  दरही वाढल्याने सरकारच्या डोळ्यातूनच पाणी आले. या दरवाढीचा फटका बसू नये याकरता केंद्राने तातडीने एक पथक नाशिकला पाठवत अहवाल मागवला. त्यानंतर मध्यंतरी  जिल्ह्यात कांदा व्यापर्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या.
आता काही प्रमाणात कांद्याचे दर नियंत्रणात आले असले तरी दिवाळीत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे . त्याची खबरदारी म्हणून जिल्हाधिकार्यांनी आताच कांद्याच्या दरावर  आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापा-यांची बैठक घेतली. गुरुवारी झालेल्या या बैठकीत कांद्याची साठेबाजी होऊन दर वाढणार नाही याची विशेष दक्षता घेत व्यापा-यांना  दिवाळीतही बाजार समित्या उघड्या ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी व्यापा-यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.
मात्र शेतकरी हितासाठी या आदेशाचे पालन करावेच लागेल, असे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले. त्यावर व्यापा-यांनी प्रथम या कालावधीत मजूर नसल्याने आलेला माल खरेदी किं वा विक्री कसा करणार? ते शक्य नाही, असे सांगितले. शिवाय कांदा शेतक-यांकडून घेतल्यानंतर ट्रक किंवा रेल्वे वॅगनद्वारे पाठवण्यासाठी, त्याची पॅकिंग करण्यासाठी आठवड्याचा  कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे 48 तासांत तो निर्यात करणे अशक्य असल्याचे सांगत आठ दिवसांची मुदत मागितली. त्यावर जिल्हाधिका-यांनी चार दिवसांची मुदत दिली.
पण या मुदतीत तुम्हाला विक्री करावी लागण्याचे स्पष्ट केले. तसेच जिल्हाधिका-यांनी दररोजचा साठा आम्हाला कळवा, अशा सूचना दिल्या. त्यामुळे अचानक दर वाढण्याची किंवा  कमी होण्याची शक्यता राहणार नसल्याचे सांगितले. तर दर वाढल्यास शेतक-यांना त्याचा सरळ फायदा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार क ार्यवाहीस सहमती दर्शवली.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी, माजी आमदार दिलीप बनकर, जयदत्त होळकर, कांदा व्यापारी सोहनलाल भंडारी, एस.के. दातीर, एस.बी. पाटील, डी.जी. शिंदे, मनीष बोरा,  रामेश्‍वर कलंत्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व 17 बाजार समित्यांचे व्यापारी, सभापती, उपसभापती, सचिव उपस्थित होते.